पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) ११,३०० कोटींच्या घोटाळ्यातील संशयित आरोपी अब्जाधीश हिरे व्यापारी नीरव मोदीवर तपास यंत्रणांनी फास आवळण्यास सुरूवात केली आहे. त्याच्या कंपन्यांबरोबरच गुरूवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नीरव आणि त्याच्या कंपनीच्या ९ महागाड्या आलिशान कार जप्त केल्या. यामध्ये सुमारे ६ कोटी रूपयांच्या रोल्स रॉयस घोस्टचाही समावेश आहे. यापूर्वी मंगळवारी सीबीआयने नीरव मोदीच्या अलिबाग येथील २७ एकरातील आलिशान फार्म हाऊसवर छापा टाकला होता.

नीरव मोदीच्या ज्या लक्जरियस कार ईडीने जप्त केल्या आहेत, त्यामध्ये एक रोल्स रॉयस घोस्ट, दोन मर्सिडीज बेंझ जीएल ३५० सीडीआयएस, एक पोर्शे पनामेरा, ३ होंडा कार, एक टोयोटा फॉर्च्यूनर आणि एका टोयोटा इनोव्हाचा समावेश आहे. रोल्स रॉयस कारची किंमत ही सुमारे ६ कोटी रूपये असल्याचे सांगण्यात येते. त्याशिवाय ईडीने नीरव मोदीचे ७.८० कोटी रूपयांचे म्युच्युअल फंड आणि शेअर्सही गोठवले आहेत. मेहुल चौकसी समूहाशी निगडीत ८६.७२ कोटी रूपयांचे शेअर्स आणि म्युच्युअल फंडही ईडीने गोठवले आहेत.

दरम्यान, याप्रकरणी सीबीआयकडून अजूनही देशभरात विविध ठिकाणी छापे टाकण्याचे काम सुरू आहे. मंगळवारी रात्री उशिरा पीएनबीच्या एका जनरल मॅनेजरला अटक करण्यात आली होती. राजेश जिंदल २००९ ते २०११ दरम्यान पीएनबीच्या मुंबई येथील ब्रॅडी हाऊस शाखेत कार्यरत होता. या घोटाळयाचा केंद्रबिंदू याच शाखेत आहे. मंगळवारीच सीबीआयने नीरवी मोदी आणि मेहुल चौकसीच्या कंपनीतील पाच लोकांना अटक केली होती. त्याचबरोबर फाईव्ह स्टार कंपनीचा सीएफओ विपुल अंबानी, कविता मानकर, नक्षत्र आणि गीतांजलीचा कपिल खंडेलवार, अर्जुन पाटील, नितेन शहा यांना अटक केली आहे.