आंध्र प्रदेशच्या गुंटूर जिल्ह्यात बुधवारी एका महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणीची गळा आवळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दुसऱ्या मुलासोबत मैत्री केल्याच्या रागातून तिच्याच मित्राने तिचा गळा दाबून हत्या केल्याचं समोर आलं आहे.

अनुषा असं मृत तरुणीचं नाव असून ती नरसारावपेट इथल्या कृष्णवेणी पदवी महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिकत होती. इंडियाटुडेच्या वृत्तानुसार, आरोपी विष्णूवर्धन रेड्डी हा देखील त्याच कॉलेजमध्ये शिकत होता. पण अनुषाची वर्गातील दुसऱ्या विद्यार्थ्यासोबत झालेली मैत्री त्याला सहन होत नव्हती. त्यामुळे त्याने अनुषाला गप्पा मारण्याच्या बहाण्याने निर्जन ठिकाणी बोलावलं आणि गळा आवळून तिचा खून केला.

अनुषाला निर्जन ठिकाणी नेल्यावर तिथे दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात रेड्डीने गळा आवळून तिचा खून केला. नंतर त्याने तिचा मृतदेह पालापाडा येथील एका कालव्यात टाकला, त्यानंतर स्वतः नरसारावपेट पोलिसांसमोर हजर झाला.

आणखी वाचा- बापरे! हत्या केल्यानंतर ह्रदय शिजवलं आणि जेवायला वाढलं; त्यानंतर…

पोलिसांनी गुन्हा दाखल करून घटनेचा तपास सुरू केला आहे. घटना उघडकीस आल्यानंतर आरोपीविरोधात महाविद्यालयातून संताप व्यक्त होत असून महाविद्यालयाबाहेर मोठ्या संख्येत विद्यार्थी-पालकांची गर्दी झाली आहे. आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची त्यांची मागणी आहे. त्यावर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी अनुषाच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच गुन्हेगाराला कठोर शिक्षा करण्यात येईल असे आश्वासन दिले .