ग्रीसने कर्जदारांनी आणखी मदतीसाठी ठेवलेल्या काटकसरीच्या अटी सार्वमतात फेटाळल्यानंतर युरोपीय समुदायात मोठा पेच निर्माण झाला असतानाच आता मात्र ग्रीसने कर्जातून बाहेर पडण्यासाठीच्या आर्थिक संपुट योजनेवर गांभीर्याने सविस्तर व ठोस प्रस्ताव मांडावेत अशी अपेक्षा जर्मनी व फ्रान्स यांनी व्यक्त केली आहे.
ग्रीसची अर्थव्यवस्था मोकळा श्वास मिळण्याची वाट पाहात असतानाच अधिकाऱ्यांनी बँका आणखी आठ दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. एटीएम मशिनमध्ये पैसेच नाहीत अशी अवस्था आहे. युरोपीयन सेंट्रल बँकेने म्हटले आहे की, ग्रीसच्या बँकांसाठी निधीची उपलब्धता करून दिली जाईल पण अटींची पूर्तता करून हा निधी पदरात पाडून घेणे ग्रीसला अवघड आहे. चर्चेसाठी आमची दारे खुली आहेत असे फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकॉइस ओलाँद यांनी सांगितले असून त्यांची जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्याशी पॅरिस येथे चर्चा झाली. ग्रीसचे पंतप्रधान सिप्रास यांनी आता गांभीर्याने व विश्वासार्ह प्रस्ताव मांडून युरोझोनमध्ये राहण्याची इच्छा प्रदर्शित करावी अशी अपेक्षा या दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली आहे. ग्रीसला मदत देण्यासाठीच्या अटींची अजूनही पूर्तता झालेली नाही, त्यामुळे ग्रीसकडून ठोस प्रस्ताव आम्हाला अपेक्षित आहेत, असे मर्केल यांनी सांगितले. दरम्यान युरोपीय देशांना माजी अर्थमंत्री वारोफकिस यांनी संतप्त होण्यास उद्युक्त केले असून आर्थिक सुधारणांची मागणी व कल्याणकारी योजनांमध्ये कपात करण्याची ठेवलेली अट हा आर्थिक मुस्कटदाबी आहे असे सांगून त्यांनी आगीत तेल ओतले होते.