केंद्र सरकारने २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरसाठी असलेले कलम ३७० हटवले होते. इथल्या यानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी युरोपीय संघाचे प्रतिनिधी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आज श्रीनगर येथे दाखल झाले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

५ ऑगस्ट २०१९ रोजी केंद्र सरकारने कलम ३७० मध्ये दुरूस्ती करून जम्मू-काश्मीरचे विभाजन केले होते. त्यातून जम्मू-काश्मीर आणि लडाख अशा दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली होती. विभाजनानंतर भेट देणारे हे तिसरे परराष्ट्रीय मंडळ आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २० सदस्यीय शिष्टमंडळ गुरूवारी जम्मू-काश्मीरला भेट देणार आहे. यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, श्रीनगरमध्ये सुरक्षा रक्षकांची दृश्यमानता कमी करण्याच्या दृष्टीने काही कामगारांनी मंगळवारी श्रीनगर विमानतळाला शहराशी जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील सुरक्षा बंकर आणि बॅरिकेड्सची तोडफोड केली.