युद्धग्रस्त येमेनमध्ये अडकून पडलेल्या एकूण १३५० जणांची सुखरूप सुटका करण्यात यश आले आहे. दोन विमाने भारतात आली त्यात तामिळनाडूचे ४६ जण आहेत. त्यात सात महिला व दोन मुलेही आहेत.
यातील बहुतांश लोक हे मदुराई व रामनाथपुरम जिल्ह्य़ातील असून मुंबईत हवाई दलाच्या दोन विमानांनी ३३४ लोक मुंबईत शुक्रवारी रात्री आले. त्यात त्यांचाही समावेश आहे. नंतर खासगी विमानाने त्यांची तामिळनाडूत जाण्याची व्यवस्था करण्यात आली.
तामिळनाडूच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. येमेनमधून किमान ६६० लोक भारतीय हवाईदलाच्या विमानांनी मुंबईत आले त्यामुळे येमेनमधून सुटका केलेल्यांची संख्या आता १०२२ झाली आहे. प्रत्येकी ३३४ व ३३० प्रवासी घेऊन दोन विमाने रात्री अनुक्रमे मुंबई व कोची येथे आली. त्यांना आधी सना येथून दिजबोतीला आणण्यात आले होते. काही प्रवासी हवाई दलाच्या सी १७ ग्लोबल मास्टर्स विमानांनी मुंबईत आले.
त्यांना नौदलाच्या आयएनएस सुमित्रा या जहाजाने सोडवले होते. परवा ३५८ प्रवाशांना भारतीय हवाई दलाच्या विमानांनी भारतात आणले होते. त्यात १६८ प्रवासी असलेले विमान कोची विमानतळावर आले तर दुसरे १९० प्रवासी असलेले विमान मुंबईत आले होते.