एक श्रेणी एक निवृत्तिवेतन या धोरणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या माजी सैनिकांना पोलिसांनी धक्काबुक्की केली व त्यांना जंतरमंतर येथून बाहेर हुसकावले. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सुरक्षेच्या कारणास्तव या माजी सैनिकांना बाहेर काढण्यात आले. दरम्यान, सरकारवर या मागणीसाठी असलेला वाढता दबाव पाहून माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी एक श्रेणी एक निवृत्तिवेतन धोरण सरकार लवकरच लागू करील, असे आश्वासन दिले आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही काही दिवसांपूर्वी माजी सैनिकांना पाठिंबा देत या धोरणाची मागणी केली होती, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अंमलबजावणीचे आश्वासन दिले होते. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, की  दिल्लीत स्वातंत्र्य दिनानिमित्ताने सुरक्षा ठेवण्यासाठी माजी जवानांना हटवले. गृहमंत्री राजनाथ सिंह यांना या प्रकाराची माहिती देण्यात आली व त्यानंतर आंदोलन करू द्यावे, अशा सूचना दिल्या, राजनाथ यांचा निरोप केंद्रीय मंत्री व्ही.के.सिंह यांच्यामार्फत पोहोचवण्यात आला.
सरकार सक्रिय -जेटली
एक पद- एक निवृत्तिवेतन या तत्त्वाबाबतचे गणित जुळवण्यावर सरकार काम करीत आहे, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज सांगितले.  ‘वन रँक- वन पेन्शन’च्या मागणीसाठी दिल्लीत आंदोलन करीत असलेल्या माजी सैनिकांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याच्या पाश्र्वभूमीवर पंतप्रधानांनी निवडणुकीत आश्वासन दिल्यानुसार ही मागणी पूर्ण करण्याची तारीख जाहीर करावी, असे आवाहन राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना केले आहे. या संदर्भात जेटली बोलत होते.