इतिहासाच्या पुनर्लेखनावरून देशात सध्या सुरू असलेला वाद अनावश्यक असून इतिहासातील काही अतिरंजित व चुकीच्या ठरलेल्या बाबी वेळोवेळी काढून टाकणे हा पुनर्लेखनातील खरा हेतू असतो, असे भारतीय इतिहास संशोधन परिषदेचे अध्यक्ष अरविंद जामखेडकर यांनी सांगितले.

मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या इतिहास परिषदेचे अध्यक्ष जामखेडकर म्हणाले, की इतिहासाचा अभ्यासक्रम ठरविण्यासाठी इतिहास परिषद नसते, तर इतिहासाच्या पुनर्लेखनासाठी लागणारे संशोधन करणे हा परिषदेचा उद्देश आहे. पुनर्लेखन हा इतिहास लेखनाचा एक भाग आहे. जेव्हा वसाहतवादाचा इतिहास लिहिला गेला, तेव्हा त्यात वेगळा दृष्टिकोन आवश्यक होता. या प्रकारचा इतिहास हा आर्थिक इतिहासाचा अभ्यास केल्याशिवाय लिहिता येणार नाही, असे प्रा. बी. बी. कोसंबी यांचे मत होते. प्रा. आर. एस. शर्मा, इरफान हबीब व इतरांनी इतिहासाचे पुनर्लेखन केले आहे. इतिहासाचे पुनर्लेखन योग्यच असते कारण आधीच्या इतिहासकारांच्या लेखनात काही त्रुटी राहिलेल्या असतात शिवाय नवीन संशोधनातून वेगळी माहिती पुढे आलेली असते. इतिहासाचे पुनर्लेखन योग्य असले, तरी इतिहास संशोधनाच्या पद्धती या अचूक असण्याची गरज आहे.

इतिहासाच्या अभ्यासक्रमाबाबत जे वाद सुरू आहेत, त्यावर विचारले असता ते म्हणाले, की इतिहासाचा अभ्यासक्रम ठरवण्याशी आमचा संबंध नसतो व ते आमचे कामही नाही. विद्वानांना संशोधनासाठी प्रवृत्त करणे हा आमच्या संस्थेचा मूळ हेतू आहे. जामखेडकर हे पुण्यातील डेक्कन कॉलेजचे कुलगुरू होते, ते इतिहासकार, भारतविद्यातज्ज्ञ तसेच पुरातत्त्वसंशोधक आहेत.