सोशल मीडियातील दिग्गज कंपनी फेसबुकने म्यानमारचे लष्करप्रमुख जनरल मिन ऑन्ग हलँग यांच्यासह अनेक वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचे फेसबुक अकाऊंट बंद केले आहे. त्यांच्याकडून सातत्याने हेट स्पीच (तिरस्कार पसरवणारा मजकूर) आणि फेक न्यूज पोस्ट केल्या जात असल्यामुळे फेसबुकने त्यांचं अकाउंट बंद केलं आहे. प्रामुख्याने, रोहिंग्या मुस्लिमांविरोधात ते पोस्ट करत होते. सोमवारी संयुक्त राष्ट्रांनीही हलँग आणि इतर लष्करी अधिकाऱ्यांनी रोहिग्यांविरोधात राबवलेली मोहीम अतिशय क्रूर असून संहारक वृत्तीचे आणि जातीयवादी असल्याचे म्हटले होते. त्यानंतर फेसबुकने ही कारवाई केली आहे.

एकूण 18 फेसबुक अकाउंट, 52 फेसबुक पेज आणि एक इन्स्टाग्राम अकाउंट बंद करण्यात आल्याची माहिती फेसबुकने दिली आहे. याशिवाय या अकाउंटवरुन करण्यात आलेल्या सर्व पोस्ट्स आणि अन्य डेटाही फेसबुकने हटवला आहे. बंद करण्यात आलेल्या अकाउंट आणि पेजला जवळपास 1.20 कोटी युजर्स फॉलो करत होते. जातीय सलोखा बिघडवण्यासाठी आमच्या सेवेचा वापर करणाऱ्या लोकांना रोखणं आमचा उद्देश आहे असं फेसबुकने सांगितलं.

सोमवारी संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या अहवालात रोहिंग्या मुस्लिंमाविरोधात मोहीम राबवल्याप्रकरणी म्यानमारच्या लष्करी अधिकाऱ्यांविरोधात खटला चालवण्याची मागणी करण्यात आली होती. तसंच, म्यानमारचं सरकार ही मोहीम रोखण्यात अपयशी ठरल्याचा ठपकाही या अहवालात ठेवण्यात आला होता.

रोहिंग्या मुस्लीम हे आपले नागरिक नाहीत अशी भूमिका घेत म्यानमार लष्कराने त्यांच्याविरोधात कारावाई सुरू केली होती, परिणामी लाखो रोहिंग्यांवर म्यानमार सोडण्याची वेळ आली.