फेसबुक हे नि:पक्षपाती व्यासपीठ असून भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी मानकांचे उल्लंघन करून त्यावर टाकलेला मजकूर काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात येईल, असे शुक्रवारी फेसबुकच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

सत्तारूढ पक्षाच्या काही राजकीय नेत्यांनी फेसबुकवर जो मजकूर टाकला होता तेव्हा या समाज माध्यमाने द्वेषमूलक भाषणांबाबतच्या नियमांचे पालन केले नाही, असा आरोप करण्यात येत होता त्या पार्श्वभूमीवर फेसबुकने वरील बाब स्पष्ट केली आहे.

फेसबुकवरील मजकुराबाबतचे धोरण भारतातील सत्तारूढ पक्षाला अनुकूल असल्याचा आरोप वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये अलीकडेच करण्यात आला होता. तेव्हापासून हे समाज माध्यम पक्षपाती असल्याबाबतचे आरोप-प्रत्यारोप भाजप आणि काँग्रेसने एकमेकांवर केले.

फेसबुक हे असे व्यासपीठ आहे की जेथे जनता मोकळेपणाने व्यक्त होऊ शकते, ते नेहमीच खुले, पारदर्शक आणि नि:पक्षपाती व्यासपीठ आहे, असे फेसबुक इंडियाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजित मोहन यांनी स्पष्ट केले आहे.