देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांना जशास तशे उत्तर द्यावे, अशा विद्रोही विचारांनी भारलेले क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना सरकारने अद्या अधिकृतरित्या शहिदांचा दर्जा दिलेला नाही. त्यांना राष्ट्रीय शहीद म्हणून लवकरात लवकर दर्जा देण्यात यावा, अशी मागणी सुखदेव यांच्या वारसदारांनी शुक्रवारी त्यांच्या स्मृतीदिनी केली आहे. आज (२३ मार्च) भगतसिंग-सुखदेव-राजगुरु यांचा स्मृतीदिन आहे.


‘स्वातंत्र्यानंतर ७० वर्षे उलटून गेली तरी भगतसिंग-सुखदेव-राजगुरु यांना अद्याप अधिकृतरित्या राष्ट्रीय शहिदांचा दर्जा देण्यात आलेला नाही. यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट दुसरी कोणती असू शकते. या तिघांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण दिले. मात्र, तरीही सरकारने अजूनही त्यांच्या कार्याचा गौरव करीत त्यांच्या स्मृतीदिनी राष्ट्रीय सुट्टी जाहीर केलेली नाही, असे सुखदेव यांच्या वारसदारांनी म्हटले आहे.