बिहार विधानसभेच्या आवारात जय श्रीरामच्या घोषणा देणाऱ्या खुर्शीद उर्फ फिरोज अहमद यांच्या विरोधात इमारत-ए-शरीयानं फतवा लागू केला आहे. फिरोज अहमद यांना इस्लाममधून बाहेर काढण्यात येतं आहे आणि ते मुर्तद (अल्लाहवर विश्वास न ठेवणारा) आहेत असाही ठपका ठेवत मुफ्ती सुहैल अहमद कासमी यांनी हा फतवा जारी केला आहे. इमारत-ए-शरियाबाबत आपल्या मनात पूर्ण आदर आहे, मात्र माझ्या विरोधात फतवा जारी करण्याआधी या घोषणा देण्यामागचा उद्देश समजून घेतला का? असा प्रश्न फिरोज अहमद यांनी विचारला आहे.

बिहारच्या जनतेसाठी, बिहारच्या विकासासाठी आणि बिहारमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी याच उद्देशानं मी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या होत्या. माझा हेतू अत्यंत शुद्ध होता, त्यामुळे मला बहिष्कृत केलं तरीही काहीही फरक पडत नाही असंही फिरोज यांनी म्हटलं आहे. जय श्रीरामच्या घोषणा दिल्यानं जर बिहारच्या १० कोटी जनतेचा फायदा होतो आहे तर मी सकाळ संध्याकाळ रामाचं नाव घेईन, इस्लाममध्ये कोणत्याही धर्माबाबत तिरस्काराला जागाच नाहीये. प्रेम आणि बंधुभाव हा इस्लामचा पाया आहे रहीम आणि राम, अल्लाह आणि श्रीराम एकच आहेत असंही फिरोझ यांनी म्हटलं आहे.

आपल्या हातात बांधलेला गंडा दाखवून फिरोज म्हटले आहेत की, मी सगळ्या धर्मांचा आदर करतो, सगळ्या धार्मिक स्थळी जाऊन मी डोकं टेकलं आहे. मी रामाची पूजा करणारा माणूस आहे, ज्या श्रद्धेनं अल्लाहला मानतो त्याच श्रद्धेनं रामालाही मानतो. हे दोघेही एकच आहेत असंही माझं मत आहे. कोणताही धर्म हा आत्म्याशी संवाद साधणारा असला पाहिजे असंही मत फिरोज यांनी व्यक्त केलं आहे.

नितीशकुमारांच्या नव्या मंत्रिमंडळात फिरोज अहमद हे अल्पसंख्याक मंत्री आहेत. तसंच ते जदयूचेही नेते आहेत. फिरोज यांनी जेव्हा जय श्रीरामच्या घोषणा दिल्या होत्या तेव्हा त्यांच्या तोंडून ही घोषणाबाजी ऐकून भाजप कार्यकर्त्यांना आनंद झाला आहे. सगळे धर्म समान आहेत आणि सगळ्या धर्मांमध्ये देशहित आणि जनहिताची बाब नमूद करण्यात आली आहे, त्यामुळे फतवा निघाला तरीही मला त्याची पर्वा नाही असं फिरोज अहमद यांनी म्हटलं आहे.