पिंपरी-चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रासह भारताच्या कानाकोपऱ्यातून नागरिक पोटापाण्यासाठी येथे येत असतात. त्यामुळे दिवसेंदिवस या शहराच्या लोकसंख्यात वाढ होत आहे. या लोकसंख्यावाढीमुळे शहरातील गुन्हेगारीतही वाढ झाल्याचे चित्र आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवडकरीता स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची मागणी होत होती. या मागणीला अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिल्याचे सुत्रांकडून कळते. येत्या महाराष्ट्र दिनी अर्थात १ मे रोजी पोलीस मुख्यालयाचे भुमिपूजन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुख्यमंत्र्यांनी नुकतेच विधीमंडळात पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, मीरा भाईंदर या वेगाने वाढणाऱ्या शहरांसाठी आयुक्तालये निर्माण करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आयुक्तालयासाठी जागा शोधण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरातील महत्वाच्या आणि मोक्याच्या जागांची पडताळणी करण्यात येत आहे. १५ ऑगस्ट २०१७ रोजीच आयुक्तालयाचे भुमिपुजन होणार असल्याची चर्चा होती. मात्र, ते अद्याप होऊ शकलेले नाही.

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागात गेल्या काही दिवसांत अनेक हत्या आणि मारहाणीचे प्रकार घडले आहेत. यामध्ये काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा समावेश आहे. तर, अनेक संशयीत दहशतवाद्यांचाही येथे वावर असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्यामुळे शहरवासीयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. सध्या येथे बाल गुन्हेगारांनी पोलिसांची डोकेदुखी वाढवली आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन आणि राजकीय नेत्यांच्या पाठपुराव्याने पिंपरी-चिंचवड शहराला पोलीस आयुक्तालय मिळणार आहे. या आयुक्तालयांतर्गत १५ पोलीस ठाणी असणार आहेत. या आयुक्तालयात पुणे ग्रामीणमधील काही भागाचा समावेश होण्याची शक्यता आहे. मात्र, ती कोणती असतील याबाबत अद्याप कुठलाही खुलासा करण्यात आलेला नाही.