केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज वर्ष २०२०-२१ चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर एकीकडे विविध प्रतिक्रिया येत आहेत. तर दुसरीकडे हा अर्थसंकल्प काही वेगळ्या कारणांमुळे विशेष देखील ठरला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज या अर्थसंकल्पाद्वारे १७ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे.

अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करण्याच्या वेळेच्यानुसार सर्वात प्रदीर्घ असे भाषण केले आहे. त्यांचे भाषण २ तास ४० मिनिटं चालले. या अगोदर माजी अर्थमंत्री जसवंतसिंह यांच्या नावावर सर्वात प्रदीर्घ भाषणाचा विक्रम आहे. त्यांनी २ तास १३ मिनिटं भाषण केले होते. त्यांच्या खालोखाल दिवगंत माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचा क्रमांक येतो. त्यांनी २ तास १० मिनिटं भाषण केले होते. तर, २०१९ मध्ये निर्मला सीतारामन यांनी २ तास ५ मिनिटं भाषण केलेलं आहे.

याशिवाय निर्मला सीतारामन या दुसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडणाऱ्या पहिल्या महिला अर्थमंत्री देखील ठरल्या आहेत. या अगोदर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देखील दोनवेळा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. मात्र, तेव्हा त्यांच्याकडे अर्थमंत्रालयाशिवाय अन्य खात्यांची देखील अतिरिक्त जबाबदारी होती.

वेळेनुसार भलेही निर्मला सीतारामन यांचे भाषण सर्वात मोठे ठरले असेल.मात्र शब्दांनुसार सर्वाधिक मोठ्या भाषणाचा विक्रम माजी पंतप्रधान व अर्थमंत्री राहिलेले डॉ.मनमोहन सिंग यांच्या नावावर आहे. त्यांनी १९९१ मध्ये अर्थसंकल्प मांडताना १८ हजार ६५० शब्दांचे भाषण केले होते. यानुसार दुसरा, तिसरा, चौथा व पाचवा क्रमांक हा अरुण जेटली यांचाच लागतो. तर, सर्वात लहान भाषण हे हिरुभाई पटेल यांच्या नावावर आहे. त्यांनी १९७७ मध्ये अवघ्या ८०० शब्दांचे भाषण केले होते.

सर्वात जास्त वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे. ज्यांनी तब्बल १० वेळा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. त्यांच्यानंतर पी.चिदंबरम यांचा नावावर हा विक्रम आहे, त्यांनी ९ वेळा अर्थसंकल्प मांडला आहे.