त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध झाले आहेत. महाभारत काळापासून इंटरनेट होते असा अजब दावा करणाऱ्या बिप्लब देव यांनी पुन्हा एकदा धक्कादायक वक्तव्य केले आहे. माझ्या सरकारकडे कोणीही बोट दाखवू नये, कोणीही नख लावण्याचाही प्रयत्न करू नये असे झाले तर एकेकाची नखे उपटून काढेन अशी धमकीच बिप्लब देव यांनी दिली. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातला एक व्हिडिओच पोस्ट केला आहे. या व्हिडिओत जनतेशी संवाद साधत असतानाच बिप्लब देव यांनी हा धमकीवजा इशारा दिल्याचे स्पष्ट होते आहे.

याआधी बिप्लब देव नागरी सेवा क्षेत्रासाठी मेकॅनिकल इंजिनियरपेक्षा सिव्हिल इंजिनियर जास्त योग्य आहेत. जे प्रशासनात आहेत त्यांना समाज बांधायचा असतो. सिव्हिल इंजिनियर्सना याचे उत्तम ज्ञान असते. त्यामुळे ज्यांची मेकॅनिकल इंजिनियरींगची पार्श्वभूमी आहे त्यांनी नागरी सेवा क्षेत्रात जाऊ नये असे अजब विधान बिप्लब देव यांनी केले होते. आता पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्या या वक्तव्याची चर्चा होते आहे.

महाभारताच्या काळापासून इंटरनेट होते असा जावईशोध लावणाऱ्या त्रिपुरामधील भाजपाच्या या मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी डायना हेडनला मिळालेल्या ‘मिस वर्ल्ड’च्या किताबावरुन वाद निर्माण केला होता. आता माझ्या सत्तेकडे बोट दाखवाल, नख लावाल तर याद राखा नखेच उपटून काढेन असे धक्कादायक वक्तव्य बिप्लब देव यांनी केले आहे. हे वादग्रस्त वक्तव्य करत बिप्लब देव यांनी एक प्रकारे आपल्या विरोधकांना धमकीच दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे नेते काहीबाही बरळताना दिसत आहेत. या नेत्यांच्या अशा बरळण्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी  आणि भाजपाच्या अडचणींमध्ये भर पडते आहे असेच दिसते आहे.