एअर इंडियाच्या व्यवस्थापकाला मारहाण केल्याप्रकरणी वायएसआर काँग्रेसचे खासदार मिथुन रेड्डी यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.गुरुवारी दुपारी तिरुपती विमानतळावर हा प्रकार घडला. त्यांच्यावर येरूपेडू पोलीस ठाण्यात मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल केला गेला आहे. राजमपेठ लोकसभा मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करतात.
मिथुन यांचे नातेवाईक एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करणार होते. त्यांना बोर्डिग पास देण्यावरून हा वाद ओढवला. या वेळी मिथुन रेड्डी यांनी तिरुपती विमानतळाच्या एअर इंडियाचे व्यवस्थापक राजशेखर यांना प्रवाशांना बोर्डिग पास देण्यावरून होत असलेल्या दिरंगाईबाबत जाब विचारला. या वेळी झालेल्या वादावादीवेळी रेड्डी यांनी मारहाण केल्याचा आरोप राजशेखर यांनी दाखल केलेल्या तक्रारीत केला आहे. पोलिसांनी खासदारांसमवेत १५ जणांवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला.