‘लोकसत्ता’च्या कशाळकर यांना मारहाण प्रकरण

प्रतिनिधी, अलिबाग

‘लोकसत्ता’चे पत्रकार हर्षद कशाळकर यांना मारहाण केल्याप्रकरणी आमदार जयंत पाटील, आमदार सुभाष पाटील यांच्यासह २५ ते ३० कार्यकर्त्यांवर अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रायगड लोकसभा मतमोजणी दरम्यान गुरुवारी ही घटना घडली होती. आमदार जयंत पाटील, आमदार सुभाष पाटील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्रावर अनधिकृतरीत्या प्रवेश करून कशाळकर यांना मारहाण केली. या प्रकाराचा राज्यभरातील पत्रकारांनी तीव्र निषेध केला आहे.   तुम्ही पत्रकार कोणत्याही बातम्या छापता, अशी ओरड करीत जयंत पाटील यांनी कशाळकर यांच्यावर हल्ला चढविला होता. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात जयंत पाटील, पंडित पाटील, अभिजित कडवे आणि इतरांवर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन कारवाई करावी, अशी मागणी पत्रकारांसह सामाजिक संघटनांकडून केली जात असून जिल्ह्य़ातील सर्व पत्रकार संघटना लवकरच आपली भूमिका जाहीर करणार आहेत.

अनधिकृत प्रवेश..

अलिबाग : ही घटना घडली तेव्हा मतमोजणी केंद्रावर बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याप्रकरणी शेकापच्या तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली. शेकापचे आ. जयंत पाटील, आ. सुभाष ऊर्फ पंडित पाटील, आ. धैर्यशील पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. अनिकेत तटकरे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आमदारांची नावे आहेत. हे चारही आमदार मतमोजणीच्या ठिकाणी निवडणूक आयोगाने नेमून दिलेल्या ओळखपत्राशिवाय शिरले होते. पोलिसांनी अटकाव केल्यानंतरही ‘आम्ही आमदार आहोत’ अशी अरेरावीची भाषा करीत त्यांनी प्रवेश केला होता.

कोण हे जयंत पाटील?

आमदार जयंत पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. पक्षाचे फारसे संख्याबळ नसतानाही सलग चार वेळा विधान परिषदेवर निवडून गेले आहेत.  रायगड जिल्ह्य़ातील मोठय़ा उद्योजकांमध्ये जयंत पाटील यांचा समावेश होतो. त्यांनी धरमतर येथे पीएनपी पोर्ट नामक खासगी बंदर विकसित केले. शहाबाज धरमतर येथील बंदर विभागाच्या अखत्यारीतील जागेमध्ये जेट्टी बांधण्यासाठी सरकारी परवानगीच्या बनावट कागदपत्र वापरल्याचा आरोप त्यांच्यासह त्यांचे पुत्र नृपाल पाटील आणि तत्कालीन प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन पंकज भटनागर यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाची सुनावणी अलिबाग न्यायालयात सुरू आहे. याशिवाय अ‍ॅल्युमिनियम बोट निर्मितीचा कारखाना त्यांच्या कुटुंबाच्या नावावर आहे. गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा अलिबागदरम्यान पीएनपी बोटसेवा ते चालवतात. कोल्हापूर आणि रावळगाव नाशिक येथील साखर उद्योगाशी ते जोडलेले आहेत. रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदावरही ते कार्यरत आहेत.  जिल्ह्य़ात पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून जिल्ह्य़ातील अनेक शाळा आणि महाविद्यालये त्यांनी काढली आहेत. ‘कृषीवल’ नावाचा पेपरही ते चालवतात, पण जिल्ह्य़ातील पत्रकारांबाबत त्यांचे धोरण कायमच असहिष्णुतेचे राहिले आहे. यापूर्वीही त्यांनी पत्रकारांसोबत वाईट वर्तवणूक केली आहे.

बांडगुळाचे ‘बंड’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेतकरी कामगार पक्षाचे तालुक्यांच्या स्तरावरचे नेते जयंत पाटील यांनी आमचे अलिबाग प्रतिनिधी हर्षद कशाळकर यांना मतमोजणी केंद्रात मारहाण केली. अजित पवार यांच्याशी समझोता करूनही मावळ मतदारसंघातून पार्थ पवार यांस निवडून आणण्यात आणि रायगड मतदारसंघातून सुनील तटकरे यांना पुरेसे मताधिक्य मिळवून देण्यात जयंत पाटील यांना आलेले सपशेल अपयश, हे त्यामागचे कारण. त्याबाबत आमच्या प्रतिनिधीने तटकरे यांच्याशी बातचीत केल्याचे पाहून हे राजकीयदृष्टय़ा ओसाडगावचे पाटील प्रक्षुब्ध झाले आणि त्यांनी आमच्या प्रतिनिधीवर हात उचलला. या जयंत पाटील यांचे कर्तृत्व काय? स्वतचे काही निर्माण करणे सोडाच पण वाडवडिलांकडून वारशात मिळालेली राजकीय जहागिरीदेखील त्यांना राखता आली नाही. त्यामुळे कधी गोपीनाथ मुंडे यांचा भाजप, कधी सेना, कधी राष्ट्रवादी, तर कधी काँग्रेस अशांशी संगनमत करून आपली दुकानदारी चालू ठेवणे इतकीच काय ती त्यांची कर्तबगारी. तेव्हा ही दुकानदारी अबाधित राहावी यासाठी कोणा ना कोणाचा आधार घेण्याखेरीज त्यांच्यापुढे पर्याय नाही. राष्ट्रवादीला साथ देण्याची कामगिरी काही पूर्ण फत्ते करता आली नाही. म्हणून ते प्रक्षुब्ध होते. आज महाराष्ट्रभर या जयंत पाटील यांच्यासारखी अनेक राजकीय बांडगुळे फोफावलेली आहेत. त्यांचे जे काही व्हायचे ते यथावकाश होईलच. पण त्यांना कायदा हाती घेण्याचा अधिकार दिला कोणी? संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या या हिंसक कृतीचा योग्य तो कायदेशीर बंदोबस्त करावा. नपेक्षा अशांना पोसण्याचे वा संरक्षण देण्याचे पाप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिकटेल. या अशा बांडगुळांची बंडे मोडूनच काढायला हवीत.