मध्यप्रदेशातील जबलपुर येथील उच्च न्यायालयाच्या इमारतीस सोमवारी सायंकाळी आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र यामुळे न्यायालय परिसरात पळापळ सुरू झाली. ही आग साउथ ब्‍लॉकच्या पहिल्या मजल्यावर लागली आहे. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

प्राथमिक माहितीनुसार उच्च न्यायालयाच्या इमारतीत सायंकाळी साधारण ६ वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीत इमारतीमधील जुने फर्निचर खाक झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या कर्मचा-यांनी तातडीने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. अग्निशामक दल घटनास्थळी दाखल होईपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काहीजणांनी ही आग शॅार्ट सर्किटमुळे लागली असल्याचे सांगितले आहे. आगीत न्यायालय इमारतीतील मोठ्याप्रमावर असलेली कायदेविषयक पुस्तक खाक झाली आहेत. तर इमारतीत असलेल्या एका एसीचा स्फोट झाल्याने आग लागल्याचेही कारण पुढे येत आहे. उच्च न्यायालयाच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर काम करणा-या एकाने एसीला आग लागल्याची माहिती प्रशासकीय अधिका-यांना दिली होती, अशीही माहिती समाोर आली आहे.