देशात करोना रुग्णांची संख्या वाढत असताना दिलासादायक बातमी समोर आली आहे. रशियातून स्पुटनिक व्ही लसीची पहिली खेप हैदराबाद विमानतळावर पोहोचली आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला वेग येणार आहे. देशात आजपासून १८ वर्षावरील सर्वांना करोनाची लस देण्यास सुरुवात झाली आहे. मात्र काही ठिकाणी लसींचा तुटवडा जाणवत असल्याने अडथळे येत आहे. अशातच स्पुटनिक व्ही लसीची पहिली खेप भारतात दाखल झाल्याने येत्या काळात लसीकरण मोहिमेला वेग येणार आहे.

सध्या भारतात सिरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस वापरली जात आहे. स्पुटनिक व्ही सोबत भारतामध्ये तिसरी लस उपलब्ध झाली आहे. भारतात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे. स्पुटनिक व्ही लसीची परिमामकारकता ९२ टक्के असल्याचं सांगण्यात येत आहे. स्पुटनिक व्ही लस एस्ट्राजेनेकाच्या लसीसारखी एक व्हायरल वेक्टर लस आहे. मात्र या लसीचे दोन्ही डोस वेगवेगळे आहेत. या लसीचे दोन डोस वेगवेगळे असल्याने करोनावर दूरगामी परिणाम दिसत आहेत. या लसीला आतापर्यंत ६०हून अधिक देशांनी मान्यता दिली आहे. ‘स्पुटनिक व्ही सर्वाधिक प्रभावी लस आहे. त्याचबरोबर करोनाच्या नव्या विषाणूवरही मारक ठरत आहे. या लसीचं देशात लवकरच प्रोडक्शन सुरु होईल आणि वर्षाकाठी ८५० दशलक्ष डोस तयार करण्याचा मानस आहे.’, असं रशियाच्या राजदूतांनी सांगितलं आहे.

दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. या चर्चेनंतर पंतप्रधानांनी ट्विटरवरून पुतिन यांचे आभार मानले होते. तसेच, दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांविषयी मंत्री स्तरावर चर्चा सुरू करण्याचा निर्णय झाल्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं.

“पुढच्या आठवड्यात भारतात सर्वोच्च रुग्णवाढ होण्याची शक्यता”, केंद्रीय तज्ज्ञांनी दिला इशारा!

भारतात गेल्या दोन महिन्यांपासून करोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या संख्येनं वाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर देशात ऑक्सिजन, रेमडेसिविर, लस यांचा तुटवडा जाणवत असताना जगातील अनेक देशांनी भारतासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. अमेरिका, फ्रान्स, युरोप, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, युएई या देशांनी आत्तापर्यंत भारताला मदत करण्याचं धोरण जाहीर केलं असून त्यासाठी सक्रीय पुढाकार देखील घेतला आहे.