देशात करोनाचा दिवसेंदिवस वाढत असलेला प्रादुर्भाव व चीनच्या घसुखोरीसह अनेक मुद्यांवरून सातत्याने मोदी सरकारवर टीका करणाऱ्या एमआयएमचे अध्यक्ष खासदार ओवेसी यांनी, पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत केलेल्या वक्तव्यांवरून ओवीसींनी मोदींना प्रश्न केला आहे की, तुमचे सरकार ८० हजार कोटी रुपयांचा बंदोबस्त करेल का? पंतप्रधान कार्यालयास टॅग करत ओवीसींनी यासंदर्भात ट्विट केलं विचारला आहे.

“सर तुमचे सरकार ८०,००० कोटी रुपयांचा बंदोबस्त करेल का? सर थाळी, टाळी, लाईट बंद, २१ दिन? ९३ हजार ३७९ मृत्यू. अगोदर घरात दिवा त्यानंतर…” अशा शब्दांमध्ये ओवेसींनी ट्विट करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

तसेच, ओवेसींनी आपल्या ट्वटिसोबतच पंतप्रधान मोदींचे देखील ट्विट जोडले आहे. ज्यामध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत की, “जगातील सर्वात मोठ्या वॅक्सिन उत्पादक देशाच्या नात्याने आज मी जगभरातील समुदायास आणखी एक आश्वासन देऊ इच्छित आहे. भारताचे वॅक्सिन उत्पादन आणि वॅक्सिन पुरवण्याची क्षमता समस्त मानवजातीस या संकटातून बाहेर काढण्यासाठी कामी येईल.”

याचबरोबर पंतप्रधान मोदींनी यावेळी “भारतानं कायम विश्वकल्याणाला प्राधान्य दिलं आहे. भारत एक असा देश आहे ज्याने आपले ५० शूर जवान जगातील विविध शांतता मोहिमेवर पाठवले आहेत. भारताने कायम संपूर्ण मानव जातीच्या हिताचा विचार केला आहे. भारतानं आपला स्वार्थ पाहिला नाही. महामारीच्या या कठीण काळातही भारताची फार्मा इंडस्ट्रीने १५० पेक्षा अधिक देशांना गरजेची औषध पाठवली आहेत”, असंही म्हटलं होतं.

तर “ पुढच्या वर्षभरासाठी केंद्र सरकारकडे ८० हजार कोटी रुपये आहेत का? कारण लस विकत घेऊन, ती प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्यासाठी इतका खर्च येणार आहे. आता आपल्याला या आव्हानाचा सामना करायचा आहे.” असे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी काल टि्वट करत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला विचारले होते. यावरून ओवेसी यांनी मोदींना प्रश्न केलेला आहे.