स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरुन चौथ्यांदा देशाला संबोधित करणार आहेत. याआधी तीनवेळा पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरुन भाषण केले आहे. या भाषणांमध्ये मोदींनी अनेकदा महत्त्वपूर्ण योजनांच्या घोषणा केल्या. यामध्ये नियोजन आयोगाचे नाव बदलून नीती आयोग करणे, खासदारांसाठी आदर्श ग्राम योजनेची सुरुवात करणे अशा काही महत्त्वपूर्ण घोषणांचा समावेश आहे. मात्र यातील अनेक योजना पूर्णत्वास गेलेल्या नाहीत. यामधील अनेक योजना फारशा यशस्वीदेखील ठरलेल्या नाहीत.

१. मोदींनी लाल किल्ल्यावरील त्यांच्या भाषणात जन धन योजनेची घोषणा केली. या योजनेच्या अंतर्गत गरिबांना डेबिट कार्ड मिळेल आणि प्रत्येक कुटुंबाला १ लाखांचा जीवन विमा मिळेल, असे मोदींनी म्हटले होते. गरिब व्यक्ती गरज असेल, तेव्हा जन धन खात्यातून पैसे काढू शकेल, असेही त्यांनी म्हटले होते. या कार्यक्रमाच्या अंतर्गत मोठ्या संख्येने जन धन खाती उघडण्यात आली. मात्र अद्याप या योजनेचा फायदा गरिबांना झालेला नाही. उलट नोटाबंदीच्या काळात याच खात्यांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर झाला.

२. देशातील ६५ टक्के जनता ३५ वर्षांखालील असल्याचे पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणात म्हटले होते. देशातील तरुणांच्या सामर्थ्याचा वापर करण्यासाठी मोदींनी स्किल इंडिया कार्यक्रमाची घोषणा केली. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कुशल कामगार तयार करण्याचा मोदींचा हेतू होता. मात्र मागील तीन वर्षांमध्ये या योजनेला मोठे यश आलेले नाही. उलट देशातील तरुणांसमोरील रोजगाराचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होतो आहे.

३. केंद्र सरकारने छोट्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि तरुणांना उद्योजक करण्यासाठी स्टँड अप योजना आणली. या योजनेची घोषणाही मोदींनी लाल किल्ल्यावरील भाषणातून केली होती. छोट्या उद्योजकांमुळे देशात रोजगार वाढतील, अशी सरकारला आशा होती. मात्र अद्याप या योजनेला पुरेसे यश मिळालेले नाही.

४. देशातील निर्मिती उद्योगाला चालना देण्यासाठी मोदींनी ‘मेक इन इंडिया’ची घोषणा केली होती. देशभरातील कंपन्यांनी भारतात निर्मिती करावी, या हेतूने या योजनेची घोषणा करण्यात आली. परदेशी कंपन्यांनी भारतात उत्पादन करावे, त्यामुळे देशातील तरुणांना रोजगार मिळेल आणि कंपन्यांना स्वस्त दरात उत्पादनाची निर्मिती करता येईल, या उद्देशाने ‘मेक इन इंडिया’ची घोषणा करण्यात आली. मात्र या योजनेला अद्याप मोठे यश मिळालेले नाही.

५. लाल किल्ल्यावरील पहिल्याच भाषणात मोदींनी सर्व खासदारांना एक गाव दत्तक घेण्याचे आवाहन केले होते. वर्षभरात या गावांचा विकास करुन त्यांचे रुपांतर आदर्श गावात करावे, अशा सूचना मोदींनी खासदारांना केल्या होत्या. मोदींच्या या घोषणेला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र अद्याप तरी या योजनेला मोठे यश मिळालेले नाही.