चारा घोटाळ्याची सुनावणी झालेल्या न्यायालयातील न्यायाधीशांची बदली करण्याची मागणी करणाऱया लालू प्रसाद यादव यांच्या याचिकेवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी राखून ठेवला. सरन्यायाधीश पी. सथाशिवम यांच्या नेतृत्त्वाखाली खंडपीठात या विषयावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निकाल राखून ठेवण्यात आला.
गेल्या ९ जुलैला याच खंडपीठाने लालू प्रसाद यादव यांच्या विरोधातील खटल्याच्या निकालाला अंतरिम स्थगिती दिली होती. तसेच सीबीआय आणि झारखंड सरकारला नोटीस बजावली होती.
संयुक्त जनता दलाचे नेते राजीव रंजन यांचे वकील शांती भूषण यांनी लालू प्रसाद यादव यांच्या मागणीला जोरदार विरोध केला. सुनावणी झाल्यावर निकाल देण्यावेळी जर न्यायाधीशांची बदली करण्यात आली, तर देशात त्याचा खूप चुकीचा अर्थ काढला जाईल, असे मत त्यांनी आपला युक्तिवाद करताना मांडले.