देशभरात ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या सर्व्हेनंतर ९० टक्के जनता नोटाबंदीच्या निर्णयाशी सहमत आहेत, पण सत्ताधारी भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांना मात्र, हा सर्व्हे मान्य नाही. त्यांनी नोटाबंदीबाबत घेतलेल्या सर्व्हेवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. नोटाबंदीवर घेतलेला सर्व्हे पूर्वनियोजित आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. मुर्खांच्या जगात जगणे सोडून द्या, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

नोटाबंदीनंतर ‘नमो अॅप’वर जनतेची मते मागवण्यात आली होती. या सर्व्हेत सहभागी झालेल्या ९० टक्के जनतेने या नोटाबंदीच्या निर्णयाला सहमती दर्शवली होती. पण शत्रुघ्न सिन्हा यांनी याच सर्व्हेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यांनी ट्विटमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता टीका केली आहे. मुर्खांच्या जगात जगणे बंद करा. या रचलेल्या कथा आहेत आणि नोटाबंदीवर करण्यात आलेला सर्व्हे स्वार्थासाठी करण्यात आला आहे, असे शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

यानंतर त्यांनी पुन्हा ट्विट करून नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाकडे लक्ष द्या, असा सल्ला दिला आहे. या नोटाबंदीच्या विषयाच्या मुळाशी जायला हवे. गरीब, हितचिंतक, मतदार, समर्थक आणि महिलांना होणारा त्रास समजून घ्यायला पाहिजे, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. माता आणि भगिनींनी कष्टाने कमावलेल्या कमाईची काळ्या पैशाशी तुलना करण्यात येऊ नये, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमो अॅपवर नोटाबंदीच्या निर्णयावर देशातील जनतेची मते मागवली होती. अॅपवरील एका सर्व्हेत जनतेला सहभागी व्हायचे होते. त्यात विचारण्यात आलेल्या दहा प्रश्नांची उत्तरे द्यायची होती. या सर्व्हेचा निकाल बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर जाहीर केला. मोदी यांनी सर्व्हेचा निकाल ट्विट केला. या सर्व्हेत भाग घेतलेल्या जनतेचे मी आभार मानतो. या निर्णयावरील विचार आणि टिप्पणी यांचे वाचन करणे समाधानकारक आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले.

मोदी यांनी ट्विटर अकाऊंटवर आपल्या लेखाची लिंकही शेअर केली. त्यात त्यांनी अॅप सर्व्हेला मोठा प्रतिसाद मिळाला. विक्रमी संख्येने लोकांनी आपले विचार मांडले. तसेच या सर्व्हेचा निकाल माहिती-तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीतही वाचून दाखवला. ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले की, या सर्व्हेमध्ये २४ तासांत पाच लाखांहून अधिक लोकांनी सहभाग घेऊन आपली मते मांडली. ही मोठी संख्या आहे. देशात अशा प्रकारच्या धोरण आणि राजनैतिक मुद्द्यांवर अशा प्रकारचा जनमत घेणारा सर्व्हे अद्यापही घेण्यात आलेला नाही. या सर्व्हेक्षणात साधारण दोन टक्के लोकांनी सरकारच्या निश्चलनीकरणाच्या निर्णयाला सर्वात वाईट असल्याचे म्हटले आहे.