ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी देशातील वाढत्या असहिष्णुतेवर पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली. त्याचबरोबर समाजातील वाढती असहिष्णुता संपूर्ण देशाच्या प्रगतीसाठी अपायकारक ठरू शकते. जर आर्थिक विकास साध्य करायचा असेल, तर सहिष्णुता अत्यावश्यक असल्याची भूमिका त्यांनी एका कार्यक्रमात मांडली.

२०१५ मध्ये एका कार्यक्रमात रघुराम राजन यांनी देशातील वाढत्या असहिष्णुतेचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी त्यांच्यावर काही जणांकडून तीव्र टीका करण्यात आली. हाच धागा पकडून त्यांनी आपण त्यावेळी मांडलेली भूमिका बरोबर असल्याचे पुन्हा एकदा सांगितले. जे लोक सार्वजनिक जीवनात आहेत. त्यांनी देशाच्या भल्यासाठी चार शब्द बोलले पाहिजेत. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी हे विचार महत्त्वाचेच आहेत. मी त्यावेळी हाच महत्त्वाचा मुद्दा मांडला होता, असे रघुराम राजन यांनी गुरुवारी सांगितले.

गौरी लंकेश यांची हत्या अत्यंत दुर्दैवी आहे. आता हा मुद्दा देशभरात चर्चिला जातो आहे. त्यामागचे कारणही समजून घेतले पाहिजे. गौरी लंकेश पत्रकारितेच्या माध्यमातून जे मुद्दे उपस्थित करत होत्या. ज्या विषयांवर आपली मते मांडत होत्या. त्यामुळेच त्यांची हत्या झाल्याची चर्चा लोकांमध्ये आहे. आता लगेचच या हत्येचे कारण काय आहे, हे सांगणे कठीण आहे. तसेच अशा पद्धतीने कोणताही तर्क काढणेही योग्य नाही. पोलीस तपास करत आहेत. तपासातूनच खूनाचे कारण स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.

राजन म्हणाले, आपला देश सेवादायी आणि कल्पक पद्धतीच्या अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करतो आहे. या दिशेने पुढे जाताना सहिष्णुता आवश्यकच आहे. ती देशाची शक्ती आहे. कोणत्याही स्थितीत सहिष्णू देश ही आपली ओळख आपण हरवून बसणार नाही, याकडे आपण लक्ष दिले पाहिजे.