मुंबई : लोअर परळ येथील कमला मिल्स कंपाऊंडमध्ये लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाल्यानंतर ही आग कशामुळे लागली याबद्दल चौकशी सुरु करण्यात आली होती. या चौकशीनंतर ही आग मोजोस ब्रिस्टो पबमध्येच पहिल्यांदा लागल्याचे स्पष्ट झाले आहे. अग्निशामक दलाने यासंदर्भातील अहवाल मुंबई महापालिकेला सादर केला आहे.
अग्निशामक दलाच्या अहवालानुसार, मोजोस ब्रिस्टो पबमधील कोळशाच्या शेगडीमुळेच ही आग भडकली. त्यानंतर पबमधील पडद्यांनी पेट घेतला आणि आग वेगाने पसरत गेली. त्यानंतर शेजारच्याच वन अबव्ह या रेस्तराँला आग लागल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे आता मोजोस ब्रिस्टोच्या मालकांवरही याप्रकरणी कारवाई होण्याची शक्यता असल्याचे वृत्त एका वृत्तवाहिने दिले आहे.
सुरुवातीला प्राथमिक अंदाजानुसार, पोलिसांनी ही आग शॉटसर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात आले होते. नेटकऱ्यांकडून मोजोस ब्रिस्ट्रोमधील एक जुना व्हिडीओ या घटनेनंतर व्हायरल झाला होता. टीव्ही ९ या वृत्तवाहिनीमध्ये निर्माते म्हणून काम कऱणारे समीर सावंत यांनी हा व्हिडीओ ट्विट केला होता. या ट्विटमध्ये त्यांनी अशाप्रकारच्या आगीच्या खेळांबद्दलच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.
‘कमला मिलमधील मोजोसमध्ये होणारे हे आगीचे खेळ सुरक्षेच्या दृष्टीने योग्य आहेत का? या हॉलेट्समध्ये सुरक्षेसंदर्भात सर्व उपाययोजना उपलब्ध आहेत का? काल रात्री लागलेली आग अशाच प्रकारच्या खेळांमधून लागली नसावी कशावरून? असे अनेक प्रश्न या व्हिडीओमुळे उपस्थित करण्यात आले होते. तसेच यासंदर्भात कोणालाच काही पडलेली नाहीय. पैसे आहेत तर उधळा असा हा प्रकार आहे’ असे ट्विट सावंत यांनी केले होते.