पाकिस्तानचा उल्लेख मात्र स्वराज यांनी टाळला

अबुधाबी : दहशतवाद हा अनेकांचे प्राण घेताना विविध प्रदेशांत अस्थिरता निर्माण करीत असून, त्यामुळे तो जगाला मोठा धोका आहे, असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन या संघटनेच्या बैठकीत विशेष पाहुण्या म्हणून बोलताना सांगितले. सुषमा स्वराज यांचे निमंत्रण रद्द करावे यासाठी पाकिस्तानने केलेले प्रयत्न फोल ठरले असून, इस्लामी देशांच्या गटात भारताला मानपान मिळाल्याने पाकिस्तानला मोठा फटका बसला आहे.

भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी सांगितले, की दहशतवाद व अतिरेकवाद ही नावे वेगळी असली तरी या ना त्या कारणाने त्यातून प्राणहानी होत आहे. धर्माच्या विकृतिकरणातून या दहशतवादाचा जन्म झाला असून, दहशतवादाचा मार्ग यशस्वी होतो असा गैरसमज झाला आहे. त्यातून त्याचा प्रसार होत आहे. सतरा मिनिटांच्या भाषणात स्वराज यांनी पाकिस्तानचा उल्लेख केला नाही. त्या म्हणाल्या, की आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व १३० कोटी भारतीय तसेच १८५ दशलक्ष मुस्लीम बंधूभगिनी यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेत. आमचे मुस्लीम बंधूभगिनी हे देशाच्या विविधतेचे प्रतीक आहेत.

पाकिस्तानने ओआयसी संघटनेला पत्र पाठवून सुषमा स्वराज यांना दिलेले निमंत्रण मागे घेण्याची विनंती केली होती.

भारताचा सुसंवादावर विश्वास-स्वराज

इस्लाम म्हणजे शांतता व अल्लाच्या ९९ नावांमध्ये हिंसाचाराला कुठेही थारा नाही. तसेच जगातील प्रत्येक धर्म हा शांतता, करुणा व बंधुत्वाचा पुरस्कार करणारा असून ज्ञान, शांतता, श्रद्धा व परंपरा यांचा पुरस्कार करणाऱ्या देशाची मी प्रतिनिधी असून, वेगवेगळे पोशाख, चवी, सांस्कृतिक व भाषिक वारसा अनेक पिढय़ा आम्ही जपला आहे. भारतातील लोकांनी विविध श्रद्धा व एकमेकांशी सुसंवादावर नेहमीच विश्वास ठेवला असे सुषमा स्वराज या बैठकीत म्हणाल्या.