ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटी क्रिकेटपटू स्टुअर्ट मॅकगिल यांचं अपहरण करुन बंदुकीचा धाक दाखवत मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिडनी येथे १४ एप्रिल रोजी घरात घुसून त्यांचं अपहरण करण्यात आलं. यानंतर त्यांना एका दुसऱ्या शहरात नेऊन त्यांना मारहाण करण्यात आली. यावेळी त्यांना बंदुकीचा धाक दाखवत धमकावण्यातही आलं. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, जवळपास एका तासानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

स्टुअर्ट यांचं अपहरण आणि मारहाण प्रकरणी ऑस्ट्रेलिया पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनुसार, स्टुअर्ट यांचं अका व्यक्तीने अपहरण करण्याचा प्रयत्न केला. नंतर अजून दोघं तिथे पोहोचले आणि जबरदस्ती कारमध्ये बसवलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ एप्रिल रोजी ही घटना घडली. स्टुअर्ट यांनी जबरदस्तीने कारमध्ये बसवून नेण्यात आलं होतं. यावेळी तिेथे त्यांना मारहाण करण्यात आली आणि धमकावण्यात आलं. एका तासाने त्यांनी सुटका केली. २० एप्रिल रोजी याप्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली आणि त्यानंतर तपास सुरु करण्यात आला.

स्टुअर्ट हे ऑस्ट्रेलियाचे माजी फिरकी गोलंदाज आहेत. १९९८ ते २००८ दरम्यान ऑस्ट्रेलियासाठी खेळताना त्यांनी ४४ सामन्यांमध्ये २०८ विकेट्स घेतल्या. शेन वॉर्नमुळे स्टुअर्ट यांच्या खेळीकडे दुर्लक्ष झालं आणि जास्त प्रसिद्धी मिळाली नाही असं म्हटलं जातं.