माजी क्रिकेटपटू आणि खासदार सचिन तेंडुलकर सुरक्षित रस्ते प्रवासासाठी पुढे सरसावला आहे. गेल्या काही महिन्यांच्या कालावधीत रस्ते प्रवासादरम्यान दुचाकीस्वारांच्या अपघातात वाढ झालेली आहे. या संख्येत घट व्हावी म्हणून सचिनने हलक्या दर्जाचं हेल्मेट बनवणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासाठी सचिनने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहील्याचं कळतंय.

“खोटा ISI मार्क लावून बनावट दर्जाच्या हेल्मेटचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई होणं गरजेचं आहे. एक खेळाडू या नात्याने मैदानात असताना चांगल्या दर्जाच्या बचावात्मक उपकरणांचं काय महत्व असतं हे मला चांगलचं माहिती आहे. त्यामुळे प्रत्येक दुचाकी चालकाला चांगल्या दर्जाची हेल्मेट मिळणं हा त्याचा अधिकार आहे.” देशभरात ७० टक्के वाहनधारकांना बनावट दर्जाचं हेल्मेट मिळत असल्याचंही सचिनने आपल्या पत्रात म्हटलं आहे.

आपल्या पत्रात रस्ते अपघातात प्राण गमवावे लागणाऱ्यांची आकडेवारी देताना, २०१६ वर्षात झालेल्या रस्ते अपघातात ३० टक्के अपघात हे दुचाकीस्वारांचे झालेले आहेत. बनावट दर्जाची हेल्मेट दुचाकीस्वारांचं योग्य पद्धतीने संरक्षण करु शकत नाहीत, आणि यामधूनच लोकांना आपले जीव गमवावे लागत असल्याचंही सचिन म्हणाला. रस्ते व वाहतूक मंत्रालय जनहितार्थ अनेक योजना राबवत असते, त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून या महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष देण्याची मागणीही सचिनने नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. यासाठी मंत्रालयाला कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास ती करायला आपल्याला आनंदच होईल असंही सचिनने आपल्या पत्रात म्हटलं आहे.