देशाचे माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे मंगळवारी सकाळी दिल्लीत निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. दिल्लीतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कामगार नेते, मुंबईच्या जनजीवनाशी जोडले गेलेले एकेकाळचे बंदसम्राट अशी जॉर्ज फर्नांडिस यांची ओळख होती. जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनामुळे कामगारांसाठी लढणारा योद्धा हरपला अशी भावना व्यक्त होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर दिल्लीतील मॅक्स केअर रुग्णालयात उपचार सुरु होते. मंगळवारी सकाळी त्यांनी रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. जॉर्ज फर्नांडिस यांचा जन्म ३ जून १९३० रोजी मंगळुरु येथे झाला. सहा भावांमध्ये जॉर्ज फर्नांडिस हे सर्वात मोठे होते. मुंबईत आल्यावर ते कामगार चळवळीत सक्रीय झाले. स्वातंत्र्यानंतर तीन वेतन आयोग आले होते. पण रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पगारात अपेक्षित वाढ झाली नव्हती. जॉर्ज फर्नाडिस १९७३ मध्ये ऑल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशनचे अध्यक्ष झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली ८ मे १९७४ रोजी मुंबईत रेल्वे कामगारांचा संप झाला. या आंदोलनाने जॉर्ज फर्नांडिस यांना लढवय्या कामगार नेता अशी ओळख मिळवून दिली.
भारताच्या राजकारणात फर्नांडिस प्रसिद्ध झाले ते आणीबाणीच्या काळात. फर्नांडिस यांचा जन्म मंगळुरु येथे झाला, कार्यक्षेत्र मुंबई पण निवडणूक लढवली तिहार तुरुंगातून. आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत ते विक्रमी मतांनी विजयी झाले होते. या निवडणुकीमुळे राजकारणात फर्नांडिस पर्वाची सुरुवात झाली. केंद्रीय दळणवळण मंत्री, रेल्वे आणि संरक्षण अशा विविध मंत्रालयाची धूरा त्यांनी सांभाळली आहे. अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात ऑक्टोबर २००१ ते मे २००४ या कालावधीत ते संरक्षणमंत्री होते. ऑगस्ट २००९ ते जुलै २०१० या काळात ते राज्यसभेत खासदार होते. १९६७ मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 29, 2019 9:16 am