नरेंद्र मोदी सरकारने लोकसभा आणि राज्यसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक पास करुन घेतलं. यानंतर देशाच्या विविध भागांमध्ये विरोध आणि हिंसाचाराला सुरुवात झाली. अगदी भारताबाहेरही या कायद्याविरोधात पडसाद उमटताना दिसले. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनेही याच मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

CAB च्या मुद्द्यावर ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या लिंकवर आपलं मत मांडताना आफ्रिदी म्हणाला, “मोदी यांची वेळ भरत आली आहे. हिंदुत्वाच्या विचारसणीचा आता देशभरातून विरोध होताना दिसतोय. काश्मीरमध्येच नाही तर संपूर्ण देश मोदींच्या विरोधात आहे. भारत सरकारने CAB कायदा त्वरित मागे घ्यावा, नाहीतर लवकरच त्यांना याचं फळ मिळेलं.”

या आधीही शाहिदी आफ्रिदीने पुलवामा हल्ल्यावर एक ट्विट करुन रोष ओढवून घेतला होता. त्याच्या या ट्विटला भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने सडेतोड प्रत्युत्तर दिलं होतं. त्यामुळे आफ्रिदीच्या या ट्विटला आता कोण प्रत्युत्तर देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.