रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी ते ट्विटरवर का सक्रीय नाहीत, याचा उलगडा केला आहे. माझ्याकडे वेळच नाही. माझ्या मते एखादी गोष्ट तुम्ही सुरू केली की त्यात सातत्य ठेवावे लागते. एखाद्या विषयावर पटकन विचार करुन २० ते ३० सेकंदात त्यावर १४० शब्दांमध्ये प्रतिक्रिया देण्याची क्षमता माझ्यात नाही. म्हणूनच मी ट्विटर व अन्य सोशल नेटवर्किंग साईट्सवर सक्रीय नाही, असे त्यांनी सांगितले.
रिझर्व बँकेच्या गव्हर्नरपदावरुन पायउतार झाल्यानंतर रघुराम राजन हे शिकागो विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. केरळ सरकारच्या वतीने कोची येथे ग्लोबल डिजिटल समिटचे आयोजन करण्यात आले असून यात रघुराम राजनही सहभागी झाले होते. या कार्यक्रमात राजन यांनी ते ट्विटरवर का नाहीत, या प्रश्नाचे अखेर उत्तर दिले. एखाद्या विषयावर पटकन विचार करून त्यावर १४० शब्दांत तेही २० ते ३० सेकंदांत प्रतिक्रिया देण्याची शैलीच माझ्यात नाही. त्यामुळे मी ट्विटर नाही, असे त्यांनी सांगितले.
रिझर्व बँक ऑफ इंडियाचे ट्विटरवर २०१२ पासून अकाऊंट असून तब्बल ३.२ लाख फॉलोअर्स देखील आहेत. मात्र, रघुराम राजन ट्विटरवर नसल्याने नेहमीच आश्चर्य व्यक्त केले जाते.
समिटमध्ये त्यांनी रोजगाराबाबत इशाराही दिला. भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे साधे आणि कौशल्याधारित असे दोन्ही प्रकारचे रोजगार हिरावून घेतले जातील, असा इशाराच त्यांनी दिला आहे. पुढील १० ते १५ वर्षांनंतर मानवासाठी केवळ अशीच कामे उरतील ज्यांत अत्युच्च वैचारिक क्षमतेची किंवा विशेष मानवी भावभावनांची अथवा कौशल्यांची गरज असेल, असे त्यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 24, 2018 2:10 am