अलीकडेच रोहतांग पास येथे अटल बोगद्याचे उद्घाटन झाले. या ठिकाणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नावाचा एक फलक होता. हा फलक इथून गायब झाल्याने, काँग्रेसने संपूर्ण हिमाचल प्रदेशमध्ये आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन ऑक्टोबर रोजी ‘अटल बोगदा’ राष्ट्राला समर्पित केला.

काँग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या राजवटीत २०१० साली काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याहस्ते या ‘अटल बोगद्या’च्या पायाभरणीचा कार्यक्रम झाला होता. तीन ऑक्टोबरच्या उद्घाटन कार्यक्रमाआधी सोनिया गांधी यांचे नाव असलेला हा फलक हटवण्यात आला, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुलदीप सिंह राठोड यांनी केला आहे.

पाहा फोटो – Atal Tunnel Photos: पाहा कसा आहे हायटेक सिस्टमसह जगातील सर्वात मोठा बोगदा

राठोड यांनी याबद्दल सरकार आणि जिल्हा प्रशासनाचा निषेध केला आहे. “पायाभरणी कार्यक्रमाच्यावेळचा फलक सरकारने पुन्हा १५ दिवसात बसवला नाही, तर आम्ही राज्यव्यापी आंदोलन छेडू” असा इशारा राठोड यांनी दिला आहे. २८ जून २०१० रोजी सोनिया गांधी यांनी काँग्रेस नेते विरभद्र सिंह आणि माजी मुख्यमंत्री प्रेम कुमार धुमल यांच्या उपस्थितीत अटल बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन केले होते असे कुलदीप सिंह राठोड म्हणाले.