देशात करोना विषाणूमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या शनिवारी २ हजार ७५२ पर्यंत, तर करोनाबाधितांची संख्या ८५,९४० पर्यंत पोहोचली. गेल्या २४ तासांत करोना मृत्यूंच्या संख्येत १०३ ची, तर करोनाचा संसर्ग झालेल्यांच्या संख्येत ३,९७०ची भर पडली, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

देशात करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ५३,०३५ असून, ३० हजार १५२ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. बरे झालेल्यांचे प्रमाण सुमारे ३५.०८ टक्के आहे. करोनाग्रस्तांच्या आकडय़ात विदेशी नागरिकांचाही समावेश आहे, असे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, मुंबईतील रुग्णाच्या आकडेवारीबरोबरच मृतांची संख्याही दिवसेंदिवस वाढते आहे. मृतांचा आकडा ७०० पर्यंत पोहोचला आहे.

राज्यातील स्थिती..

राज्यात एका दिवसात १६०६ नव्या रुग्णांची भर पडली. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३० हजार ७०६ झाली आहे. चोवीस तासांत ६७ करोनाबाधितांचा मृत्यू झाला असून यात मुंबईतील ४१ जणांचा समावेश आहे.

पोलीस दल हादरले..

मुंबई पोलीस दलातील दोन अधिकाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू झाला. शाहूनगर पोलीस ठाण्यातील ३२ वर्षीय साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि मोटार परिवहन विभागातील साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हे दोन अधिकारी शनिवारी करोनाचे बळी ठरले. पोलीस दलातील बळींचा आकडा वाढत असतानाच आता एका तरुण अधिकाऱ्याच्या मृत्यूने पोलीस दल हादरले आहे. मुंबई पोलीस दलात आत्तापर्यंत करोनामुळे आठ मृत्यू झाले आहेत.