नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशात निर्माण झालेल्या ‘चलन’कल्लोळावर नियंत्रण मिळवण्यात केंद्र सरकारला अद्याप यश आल्याचे दिसत नाही. चलन तुटवड्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील टोलमाफीला चौथ्यांदा मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता येत्या २ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील कोणत्याही वाहनांना टोल लागणार नाही. वारंवार मुदतवाढ देण्यात येत असल्याने सारे काही आलबेल नसल्याचे दिसत आहे. आता राज्य मार्गावरील टोलमाफीबाबत राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय महामार्गावर टोलमाफीला मुदतवाढ देण्यात आली आहे. दि. २ डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर १५ डिसेंबरपर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांवर जुन्या ५०० रूपयांच्या नोटा स्वीकारण्यात येणार असल्याचेही वाहतूक मंत्रालयाने जाहीर केले आहे. दरम्यान, केंद्रापाठोपाठ राज्य सरकारनेही राज्य मार्गावरील टोलमाफीची मुदत २ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासंबंधीची घोषणा केली.

वाहनधारकांना हा तात्पुरता दिलासा असला तरी या निर्णयावरून अद्याप काहीही आलबेल नसल्याचे हे द्योतक असल्याचे अर्थतज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. यापूर्वी केंद्राने टोलमाफीचा निर्णय जाहीर केल्यानंतर राज्य सरकारनेही राज्य मार्गावरील टोलमाफीला मुदतवाढ दिली होती.

यापूर्वी ११ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत टोलमाफी करण्यात आली होती. त्यानंतर १४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. परंतु चलन समस्या सुटत नसल्यामुळे पुन्हा १८ नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढवली होती. त्यात बदल करत पुन्हा २४ नोव्हेंबरपर्यंत टोलमाफीचा कालावधी वाढवला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात येत असल्याची घोषणा केल्यानंतर दि. ८ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून टोलनाक्यांवर त्या नोटा स्वीकारण्यावरून प्रवासी व कर्मचाऱ्यांमध्ये वाद सुरू झाले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. देशातील चलन तुटवड्यावर परिणामकारक मार्ग काढता न आल्यामुळे अजूनही गोंधळ सुरूच आहे. अजूनही या समस्येवर संपूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात केंद्राला यश आलेले नाही. त्यामुळे केंद्राने पुन्हा एकदा टोलमाफीला मुदतवाढ दिली आहे.