मुरुगन एस. नावाचा लहान मुलगा कोचीतल्या रस्त्यांवर एकेकाळी अन्नासाठी वणवण करत भीक मागायचा. येणाऱ्या जाणाऱ्या अनोळखी माणसांना अन्नाची भीक मागायचा. त्याचे वडील दारु प्यायचे.. त्याची आई रोजंदरीवर काम करुन कसंतरी दोनवेळा कुटुंबाचं पोट भरायची.. अन्नाची भ्रांत असल्याने अन्नासाठी दाही दिशा अशीच वेळ या मुरुगनवर आली होती.

नंतर एक दिवस पोलिसांना तो एका अनाथ आश्रमात आढळला. त्याची काळजी तिथल्या नन्सनी अनेक वर्षे घेतली होती. या अनाथ आश्रमात मुरुगन हा मोठा झाला. तिथे मदर टेरेसा, श्री नारायण गुरु यांच्या सामाजिक कार्याशी त्याची ओळख झाली. त्यांनी समाजासाठी दिलेलं देणं हे माझ्या मनात घट्ट रुजलं.. हे सगळं कसं झालं ते मला आता नेमकं कळत नाही असं ३४ वर्षांच्या मुरुगनने सांगितलं.

लहान मुलांसाठीचा स्वयंसेवक म्हणून सात वर्षे मुरुगनने काम केलं. आपल्याकडे साठलेल्या पैशांमधून त्याने एक रिक्षाही विकत घेतली. त्यानंतर तो आपल्या रिक्षातून दिव्यांग व्यक्ती, गतीमंद मुलं.. ज्येष्ठ नागरिक यांची रस्त्यावरुन सुटका करु लागला. २००७ मध्ये त्याने मनाशी खूणगाठ बांधली की आपल्याला समाजसेवाच करायची आहे. त्याने एका NGO चीही स्थापना तोवर केली. थेरुवरम या नावाने त्याने ही NGO सुरु केली. थेरुवरमचा मल्याळममधला अर्थ रस्ता असा होतो..

सध्याच्या करोना काळात अनेक भारतीयांना बेघर व्हावं लागलं. सोशल डिस्टन्सिंग लोक पाळत आहेत. लॉकडाउनचे चटकेही सहन करत आहेत. या काळात मुरुगन आणि त्याच्या आठ सदस्यांनी बेघर लोकांना निवारा देण्याचं मोलाचं काम केलं. यामधले जवळपास ९० टक्के लोक बाहेरच्या राज्यातले होते. अनेकांची वयं २० ते ४० च्या घरातली होती. यामधल्या बहुतांश लोकांना दारु आणि अंमली पदार्थ यांचं व्यसनही लागलं होतं… त्यामुळे त्यांना मानसिक आजारही जडले होते असं मुरुगन यांनी सांगितलं.

आम्ही अशा लोकांना रस्त्यांवरुन उचललं.. त्यांना अंघोळ घातली. त्यानंतर त्यांना मनोरुग्णालयात किंवा रुग्णालयात पोहचवलं. रस्त्यावरुन अशा लोकांची सुटका करण्यासाठी आम्ही आधी पोलिसांची संमती घेतली. प्रत्येक माणसाला घेऊन जाण्याआधी आम्ही या प्रकारची संमती घेतली असं मुरुगन यांनी स्पष्ट केलं.

 

 

थेरुवरम या NGO मध्ये मुरुगन यांचे सहा सहाय्यक आहेत. तर दोन वाहन चालक आहेत. त्यांच्याकडे असोसिएशन ऑफ मल्याळम मुव्ही आर्टिस्ट्सनी दिलेली एक रुग्णवाहिकाही आहे. केरळच्या सिनेसृष्टीतील कलाकार, हिंदुस्थान पेट्रोलियम लि. यांनी ही रुग्णवाहिका या NGO ला दान केली आहे. या रुग्णवाहिकेला एक पाण्याची टाकी आणि एक शॉवरही बसवण्यात आला आहे. रस्त्यावर सापडणाऱ्या लोकांना अंघोळ घालण्यासाठी या शॉवरची मदत होते.

लॉकडाउन जाहीर झाल्याच्या सुरुवातीच्या काही आठवड्यांपासून एप्रिल महिन्याच्या शेवटापर्यंत मुरुगन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रस्त्यावरच्या ६१७ लोकांची सुटका केली. केरळमधल्या ६ जिल्ह्यांमध्ये त्यांनी हे कार्य केलं. यामधल्या अनेक लोकांनी गेल्या काही महिन्यांपासून अंघोळही केली नव्हती. गेल्या अनेक महिन्यांपासून हे लोक अस्वच्छ होते. त्यांना आम्ही अंघोळ घातली, त्यांची काळजी घेतली. त्यांच्यामुळे किंवा त्यांना कोणताही संसर्ग होऊ नये हेदेखील पाहिले असेही मुरुगन यांनी सांगितले. कोलम मध्ये आम्हाला एक माणूस सापडला, त्याच्या हातात स्टीलची अनेक कडी होती.. आम्ही त्याला अग्नीशमन दलाकडे घेऊन गेलो आणि त्याच्या हातात असलेली ती कडी कापून त्याची सुटका केली.

थेरुवरमकडे सध्याच्या घडीला दोन रुग्णवाहिका आहेत. दिवसाला या दोन्ही रुग्णवाहिकांना ८ हजारांचे इंधन लागते. तसंच शेव्हिंग किट्स, कपडे, मास्क सॅनेटायझर्स याचीही व्यवस्था करावी लागते. आमची NGO ही लोकांनी दिलेल्या दान दिलेल्या पैशांवर चालते अशीही माहिती मुरुगन यांनी दिली. २०१२ मध्ये समाजसेवेचं भान जपणाऱ्या या रिक्षावाल्याला त्यावेळी राष्ट्रपती असणारे प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते विशेष पुरस्कार मिळाला. तर टाइम्स नाऊ तर्फे अमेझिंग इंडियन्स या पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुरुगन यांना मिळाला आहे.