केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांची ग्वाही

नवी दिल्ली : देशात आत्तापर्यंत तीन टक्के लसीकरण झाले असले तरी, करोना प्रतिबंधक लशींच्या २१६ कोटी मात्रा डिसेंबरपर्यंत दिल्या जातील, म्हणजेच १०८ कोटी नागरिकांचे लसीकरण पुढील सहा महिन्यांमध्ये पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी दिली.

मोदी सरकारकडे लसीकरणाचे धोरण नसल्याची टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केल्यानंतर त्यांना उत्तर देताना जावडेकर म्हणाले, ‘‘लसीकरणाची खरोखरच चिंता असेल तर, काँग्रेसप्रणीत राज्यांमध्ये काय चालले आहे ते बघा. १८ ते ४४ वयोगटासाठी केंद्राने लसमात्रांचा दिलेला कोटादेखील या राज्यांनी उचललेला नाही.’’

लसीकरणासाठी कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लशींचा वापर केला जात आहे. शिवाय, झायडस कॅडिला कंपनीची लस, नोव्हाव्हॅक्स, स्पुटनिक, जनोव्हा या लशी उपलब्ध होतील. परदेशी  लशीही देशात मिळू शकतील. एकूण २१६ कोटी लशींचे उत्पादन केले जाणार असल्याने २०२१ संपण्यापूर्वी संपूर्ण लसीकरण केले जाईल, असे जावडेकर म्हणाले.

लसीकरण हाच उपाय असल्याचे राहुल गांधी म्हणतात, परंतु आम्ही करोना आपत्तीच्या पहिल्या दिवसापासूनच ते म्हणत आहोत. देशात २० कोटी लोकांना लस दिली असून सर्वांत वेगाने आणि सर्वाधिक लसीकरण करणारा भारत  जगभरातला दुसरा देश ठरला आहे, असे जावडेकर यांनी सांगितले.

फायझर आणि मॉडर्ना या परदेशी कंपन्यांच्या लशी आयात करण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे, जुलैपर्यंत फायझर लस भारतात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्याचा संदर्भ देत, ‘‘देशात ऑगस्टपासून लशींची उपलब्धता वाढेल’’, असे जावडेकर म्हणाले.

जावडेकर काँग्रेसला उद्देशून म्हणाले, ‘‘तुम्ही टूलकिट तयार केल्याचे आता स्पष्टच झाले आहे. त्याला आता कोणत्याही पुराव्यांची गरज नाही. तुम्ही ज्या प्रकारची भाषा वापरत आहात आणि लोकांच्या मनात संभ्रम आणि भीती निर्माण करत आहात, हाही त्याच राजकारणाचा भाग आहे.

कोव्हॅक्सिनला  विरोध कोणी केला?

देश लसउत्पादनाची राजधानी बनला असल्याचे राहुल गांधी म्हणाले. त्याचा संदर्भ देत, ‘‘कोव्हॅक्सिन ही लस पूर्णत: भारतीय बनावटीची आहे. पण, कोव्हॅक्सिनच्या उपयुक्ततेवर काँग्रेसचे नेते शंका घेत होते. लोकांनी कोव्हॅक्सिन घेऊ  नये, यासाठी गैरप्रचार करत होते. काँग्रेसच्या एका नेत्याने तर या लशीचा ‘मोदी लस’ असा उपहासही केला होता. पण मोदींनी कोव्हॅक्सिन लस घेतली आहे, असे जावडेकर यांनी सांगितले.

सर्वकाही टूलकिटनुसार…

काँग्रेसच्या ‘टूलकिट’च्या पटकथेनुसार राहुल गांधी यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी ‘नाटकीपणाची सवय’ असा शब्दप्रयोग केला. मोदी करोनाविरोधात लढत असताना त्यांच्याविषयी अपशब्द वापरणे हा देशाचा अपमान आहे, असे जावडेकर म्हणाले.