डॉ. मलगट्टी यांचा साहित्य अकादमी कार्यकारी मंडळाचा राजीनामा
लेखक व कलाकारांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे रक्षण करण्यात साहित्य अकादमी वचनबद्ध आहे, असे अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ त्रिपाठी यांनी म्हटले आहे. राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षतेच्या मूलभूत मूल्यासही आम्ही वचनबद्ध आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र तरीही साहित्य अकादमी पुरस्कार परत करण्याचे सत्र सुरूच असून गुजरातमधील विख्यात आदिवासी कार्यकर्ते गणेश देवी यांनी रविवारी साहित्य अकादमीचा पुरस्कार परत केला.
बंगळुरू येथील वृत्तानुसार कन्नड लेखक व संशोधक डॉ. अरविंद मलगट्टी यांनी साहित्य अकादमीच्या कार्यकारी मंडळाचा राजीनामा दिला असल्याचे जाहीर केले आहे. कलबुर्गी यांच्या हत्येवर साहित्य अकादमीने मौन पाळल्याने त्यांनी हे पाऊल उचलले आहे. राजीनामा पत्र सचिव व अध्यक्षांना पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले.
पंजाबचे गुरुबचन भुल्लर, अजमेर सिंह औलाख व आत्मजित सिंह यांनी आज साहित्य अकादमी पुरस्कार परत करणार असल्याचे सांगितले. जात, वर्ण, वंश, राष्ट्रीयता याच्यापलीकडे जाऊन अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे रक्षण करण्यावर आमचा भर आहे. कुठल्याही साहित्यिकावर व कलाकारावर कुठेही हल्ला झाला असला तरी त्याचा आम्ही निषेधच करतो. नयनतारा सेहगल, सारा जोसेफ, उदयप्रकाश व अशोक वाजपेयी यांनी साहित्य अकादमीचे पुरस्कार परत केले असून कवी सच्चिदानंदन व केकी दारूवाला यांनी कलबुर्गी हत्याप्रकरणी निषेध केला होता व वाढत्या असहिष्णुतेबाबत चिंता व्यक्त केली होती.

देशात मुक्त विचारांचा संकोच – देवी
‘आफ्टर अ‍ॅम्नेशिया’ या पुस्तकासाठी १९९३ साली मिळालेला साहित्य अकादमी पुरस्कार आपण परत करत आहोत, असे देवी यांनी अकादमीचे अध्यक्ष प्रा. विश्वनाथ प्रताप तिवारी व उपाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कांबर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
देशात मुक्त विचारांचा होत असलेला संकोच आणि मतभिन्नतेबाबत वाढत चाललेली असहिष्णुता यांच्याबद्दल आपली चिंता व्यक्त करण्यासाठी ज्या अनेक प्रख्यात लेखकांनी नुकतेच त्यांचे पुरस्कार परत केले आहेत, त्यांच्याबाबत एकता व्यक्त करण्यासाठी मी ही कृती करत आहे, असे ‘पद्मश्री’ उपाधीने सन्मानित करण्यात आलेले देवी यांनी या पत्रात म्हटले आहे.