आज देशभरामध्ये गणेश चतुर्थीचा उत्साह दिसून येत आहे. महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवाला विशेष महत्व असले तरी इतर राज्यांमध्येही मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो. देशाबरोबर परदेशात राहणारे अनेक भारतीय गणेशोत्सव दणक्यात साजरा करतात. मग अगदी अमेरिकेपासून ते आफ्रिकेपर्यंत आणि पाकिस्तानपासून ऑस्ट्रेलियापर्यंत सर्वच देशांमध्ये जिथे जिथे भारतीय आहेत तिथे गणरायाची प्रतिष्ठापना करुन हा उत्सव साजरा केला जातो. बरं केवळ मुर्तीची प्रतिष्ठापना करुन तिचे विर्सजन करण्यापुरताच हा उत्सव मर्यादीत नसतो. अनेक संस्कृतीक कार्यक्रमांची रेचलेच या उत्सवादरम्यान असते. या उत्सवामध्ये केवळ तेथील भारतीयच सहभागी होतात असं नाही. तेथील स्थानिक लोकही मोठ्या प्रमाणात या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होतात. असाच एक परदेशामधील व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. अभिनेते अनुपम खैर यांनीही हा व्हिडीओ ट्विटवरून शेअर केला आहे.

अनुपम खैर यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ आहे आफ्रिकेमध्ये असणाऱ्या युगांडा देशामधील एन्टेबे शहरामधील गणेशोत्सवाचा. या व्हिडिओमध्ये भारतीय आणि स्थानिक लोक गणरायाचा जयघोष करताना दिसत आहेत. आफ्रीकेमधील पारंपारिक वेषभूषेमधील वादक जोरजोरात ड्रम्स वाजवत असून ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘मोरया रे बाप्पा मोरया रे’चा जयघोष करताना या व्हिडिओत दिसत आहेत. ड्रम्स वाजवतानाच पायाने ठेका धरत हे वादक जागेवरच ड्रम्सच्या तालावर नाचत आहेत. विशेष म्हणजे मुंबई, पुण्यातील मिरवणुकांमध्ये दिसणाऱ्या भगव्या रंगाच्या गणपती बाप्पा मोरया लिहिलेल्या गांधी टोप्या घातलेले गणरायाचे भक्तही या व्हिडिओमध्ये बाप्पाचा जयघोष करताना दिसत आहेत.

हा व्हिडीओ ट्विट कराताना खैर म्हणतात, ‘हे जादूई आहे!!! युगांडा देशामधील एन्टेबे शहरातील गणेश मंदिरामध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या गजरामध्ये गणेशोत्सव साजरा केला जात आहे. वाजणाऱ्या ड्रम्सचा आणि ते वाजवणाऱ्या व्यक्तींच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहा.’

या व्हिडीओला साडेतीन हजारहून अधिक रिट्विटस मिळाले आहेत तर एकूण ८४ हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. जगभरात गणेशोत्सव तेथे स्थायिक झालेले भारतीय किती उत्साहाने साजरा करतात याचेच हे बोलके उदाहरण आहे असं म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.