ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. लंकेश यांच्या हत्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांची विचारधारा जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता. त्यावर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु होण्यापूर्वीच राहुल यांनी या हत्येला आरएसएस आणि त्यांची विचारधारा जबाबदार असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. भाजप आणि आरएसएसच्या विचारधारेचा जो विरोध करेल, त्याची हत्या करण्यात येते, असे राहुल म्हणाले होते. चौकशीपूर्वीच त्यांनी भाजप आणि आरएसएसला दोषी ठरवले आहे. तर मग सरकारने या प्रकरणाची चौकशी बंद केली का?, असा सवाल प्रसाद यांनी केला.

यावेळी प्रसाद यांनी गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध केला. लंकेश यांच्या हत्येच्या घटनेवर कर्नाटक सरकारने उत्तर द्यायला हवे. त्यांच्या हत्येमागे नक्षलवाद्यांचाही हात असल्याचे म्हटले जात आहे, असेही प्रसाद म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. कुणाच्याही हत्येचा निषेध करायला हवा. ते योग्यच आहे. आपल्या समाजात हिंसेला थारा नाही. मारेकऱ्यांच्या विरोधात आवाज उठवायलाच हवा. पण केरळ आणि कर्नाटकमध्ये आरएसएस आणि भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या त्यावेळी उदारमतवादी लोक गप्प का बसले? त्यावेळी त्या हत्यांचा निषेध का नोंदवला गेला नाही, असा सवालही प्रसाद यांनी केला.

गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास विशेष तपास पथकामार्फत करण्यात येत आहे. या घटनेवर कर्नाटक सरकारने उत्तर द्यायला हवे. नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करावे, यासाठी लंकेश सरकारची मदत करत होत्या का?, असा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना माझा प्रश्न आहे. त्या सरकारच्या मदतीसाठी या प्रकल्पावर काम करत होत्या तर त्यांना सुरक्षा का पुरवण्यात आली नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.