फेसबुक आणि गुगल या महाकाय कंपन्यांचा विनाश अटळ असल्याचे भाकीत अब्जाधीश समाजसेवक जॉर्ज सोरॉस यांनी स्वित्झर्लंडमधील दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेत केले.

सोरॉस फंड मॅनेजमेंट एलएलसीचे संस्थापक जॉर्ज सोरॉस यांनी गुरुवारी दावोस येथील परिषदेत रात्रीच्या मेजवानीप्रसंगी भाषण केले. त्यात त्यांनी सिलिकॉन व्हॅलीतील तंत्रज्ञान कंपन्यांच्या भवितव्यावर, समाजमाध्यमांच्या बदलत्या भूमिकेवर आणि त्याच्या लोकशाहीवरील परिणामांवर विस्तृत भाष्य केले. विविध देशांच्या सरकारांकडून आणली जाणारी नियंत्रणे आणि कर व्यवस्था यांमुळे फेसबुक आणि गुगल या कंपन्यांची मक्तेदारी संपुष्टात येईल, असे भाकीत सोरॉस यांनी केले.

फेसबुक आणि गुगलसारख्या तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या एकाधिकारशाहीमुळे व्यक्तीचे अधिकार, बाजारातील नवे संशोधन आणि लोकशाही यांना धोका उत्पन्न होत आहे. याच्या परिणामांची जाणीव आपल्याला नुकतीच होऊ लागली आहे, असेही सोरॉस म्हणाले. फेसबुक आणि गुगलने मात्र या संदर्भात प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

अमेरिका आणि युरोपमधील सरकार आणि अन्य संस्थांनी गुगल आणि फेसबुकसारख्या तंत्रज्ञान कंपन्यांवर नियंत्रणे आणण्यास सुरुवात केली आहे. त्यांचा रोख प्रामुख्याने ऑनलाइन जाहिराती आणि समाजमाध्यमांवरून पसरणारी खोटी माहिती यांच्यावर आहे. त्यानंतर फेसबुक आणि गुगलने आणखी सरकारी नियंत्रणांना तयारी दाखवली आहे. गेल्या आठवडय़ात फेसबुकने त्यांच्या ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून समाजमाध्यमे काही वेळा लोकशाहीला मारक ठरू शकतात, हे मान्य केले. त्या पाश्र्वभूमीवर सोरॉस यांच्या या वक्तव्याला महत्त्व आहे.

युरोपमधील संस्थांनी फेसबुक, गुगल, अ‍ॅपल यांसारख्या कंपन्यांवर असमान स्पर्धाविरोधी कायदा (अँटिट्रस्ट लॉ) आणि अन्य नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई केली आहे.

अमेरिकेने युरोपच्या या उदाहरणावरून शिकले पाहिजे. अमेरिकेतील तंत्रज्ञान कंपन्यांची मक्तेदारी मोडीत निघणे हा आता थोडय़ा वेळाचाच प्रश्न आहे. आणि त्यांचे दिवस भरले असल्याची घोषणा करण्यासाठी दावोस हे चांगले ठिकाण आहे, असे सोरॉस यांनी म्हटले.