समलैंगिक संबंधांना होणाऱ्या विरोधामुळे गाझियाबाद येथे एका तरुणीने शिक्षिकेच्या मदतीने आईची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी संबंधित तरुणीला व तिच्या प्रेयसीला अटक केली आहे.

कवीनगर येथील २१ वर्षांच्या रश्मी राणा या तरुणीचे तिच्याच विभागात खासगी क्लास चालवणाऱ्या निशा गौतम या शिक्षिकेशी प्रेमसंबंध होते. दोन वर्षांपूर्वी दोघींचे सूत जुळले होते. मात्र या संबंधांना रश्मीच्या घरातून विरोध होता.

काही महिन्यांपूर्वी रश्मी निशासह घरातून पळाली होती. मात्र प्रकरण पोलिसांकडे गेले आणि रश्मी पुन्हा घरी परतली. निशाने रश्मीला फुस लावून पळवून नेल्याचा आरोप रश्मीच्या कुटुंबीयांनी केला होता. रश्मीची आई पुष्पादेवी यांचा या संबंधांना तीव्र विरोध होता.

९ मार्च रोजी पुष्पा देवी यांनी रश्मी आणि निशाला आक्षेपार्ह अवस्थेत पकडले. यावरून रश्मी आणि पुष्पादेवी यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. संतापाच्या भरात रश्मीने आईच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार केला. पुष्पादेवी यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरु होताच रश्मी आणि निशा तिथून पळून गेले. हा प्रकार घडला त्या वेळी रश्मीचे बाबा कामानिमित्त घराबाहेर गेले होते.

रश्मीच्या बहिणीने त्या दोघींना घरातून बाहेर पडताना बघितले होते. तिने घरी धाव घेतली असता तिला पुषदेवी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. तिने तातडीने घटनेची माहिती वडिलांना दिली.  रश्मीचे वडील सतीश कुमार यांनी पोलिसांकडे मुलीविरोधात तक्रार दिली.
दुसरीकडे रुग्णालयात उपचारादरम्यान पुष्पदेवी यांचा मृत्यू झाला. त्यामुळे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली.

अखेर मंगळवारी पोलिसांनी गाझियाबाद रेल्वे स्थानक परिसरातून रश्मी व निशाला अटक केली. चौकशीत रश्मीने हत्येची कबुली दिली असून प्रेम संबंधांना आईकडून विरोध होत असल्याने तिची हत्या केली अशी कबुली तिने दिली.