उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगर जिल्ह्यामध्ये एका मुलाचा छेडछाडीच्या उद्देशाने पाठलाग करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात मुलीच्या वडिलांना आणि भावाला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अटक करण्यात आलेल्या पिता-पुत्राने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी संध्याकाळी करवारा गावामध्ये दोन व्यक्तींनी एका संघ कार्यकर्त्याची हत्या केली. हा तरुण मागील बऱ्याच काळापासून एका मुलीचा सतत पाठलाग करायचा. या मुलाच्या त्रासाला कंटाळेल्या मुलीने संबंधित प्रकाराची माहिती आपल्या वडिलांना आणि भावला दिली. त्यानंतर या दोघांनी रागाच्या भरात या तरुणाची हत्या केली.

पंकज असे हत्या झालेल्या संघाच्या कार्यकर्त्याचे नाव असून तो २३ वर्षांचा होता. तो स्वामी कल्याणदेव कॉलेजमध्ये पदवीचे शिक्षण घेत होता. या प्रकरणाची माहिती देताना मुजफ्फरनगरचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक अभिषेक यादव यांनी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींनी गुन्ह्यांची कबुली दिल्याचे सांगितले आहे. या दोघांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास केला असता त्यांना जवळच्या हर्सोली गावाच्या हद्दीतील जंगलामधून पंकजचा मृतदेह पोलिसांना सापडला.

शनिवारी संध्याकाळी पंकज त्याचा मित्र सोनूबरोबर मोटरसायकलवर घरुन निघाला होता. पंकजला एक फोन कॉल आल्यानंतर त्याने सोनूला रस्त्यात मध्येच उतरवले आणि घरी जाण्यास सांगितले. ‘मी थोड्याच वेळात घरी येतो,’ असा निरोप सोनू जवळ पंकजने दिला होता. मात्र पंकज रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने त्याच्या घरच्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. जेथे पंकजने सोनूला सोडले होते तेथे पोलिसांनी काही रक्ताचे डाग दिसले. याच रक्ताच्या डागांच्या आधारे पोलिसांनी पंकजशी संबंधित लोकांची माहिती काढून तपास सुरु केला. त्यानंतर त्यांना या मुलीसंदर्भात समजले आणि त्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.