X
X

पाचव्या इयत्तेतील विद्यार्थिनीवर मुख्याध्यापक आणि शिक्षकाने केला बलात्कार, मुलगी गर्भवती

READ IN APP

शाळेच्या मुख्याध्यापकाने आणि शिक्षकानेच पाचव्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

शाळेच्या मुख्याध्यापकाने आणि शिक्षकानेच पाचव्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारची राजधानी पाटण्यामध्ये एका खासगी शाळेत ही घटना घडली. मागच्या महिन्याभरापासून पीडित मुलीचे लैंगिक शोषण सुरु होते. पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापक आणि शिक्षकाला अटक केली आहे.

पीडित मुलीने तिच्या पोटात दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर आई-वडिल तिला वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरकडे घेऊन गेले. त्यावेळी ती गर्भवती असल्याचे समजले. त्यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार उघड झाला. उत्तर पत्रिकेचे मूल्यांकन करायचे असल्याचे सांगून आरोपी शिक्षकाने तिला मुख्याध्यापकांच्या चेंबरमध्ये बोलावले होते. तिथे दोघांनी मिळून तिच्यावर बलात्कार केला असे पोलिसांनी सांगितले.

मुख्याध्यापकाने त्याच्या चेंबरमध्ये गुप्त बेडरुम बनवला होता. तिथे तो या मुलीवर बलात्कार करायचा असे पोलिसांनी सांगितले. दोन्ही आरोपींनी पीडित मुलीवर जेव्हा पहिल्यांदा बलात्कार केला तेव्हा त्यांनी या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण केले. नंतर त्यांनी या मुलीला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. त्यांनी या मुलीला धमकावले होते. कोणाकडे वाच्यात केली तर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची त्यांनी धमकी दिली होती अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापक आणि शिक्षक दोघांना अटक केली आहे. दोघांच्या मोबाइल फोनमध्ये या मुलीचे फोटो सापडले. आम्ही या प्रकरणाचा वेगाने तपास करुन पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळवून देऊ असे बिहार पोलिसांनी सांगितले.

23
X