न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरलेले ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांना शिक्षा देऊ नये. त्यांना पुन्हा चूक न करण्याची समज द्यावी, न्यायालयाने एवढे औदार्य दाखवावे, अशी विनंती महान्यायवादी के. के. वेणुगोपाल यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाला केली.

एखाद्याला दुखावले असेल तर त्याची माफी मागण्यात चूक काय? चुकीबद्दल गांधीजीही माफी मागत असत. माफी मागितल्याने तुम्हाला (भूषण) खुजेपणा येत नाही, अशी टिप्पणी न्या. अरुण मिश्रा यांनी केली.

दबाव आणून कोणालाही माफी मागण्यासाठी प्रवृत्त केले जाऊ शकत नाही. न्यायालयाने टोकाची टीकाही सहन केली पाहिजे आणि ती सहन करण्याची क्षमता न्यायालयाकडे असली पाहिजे, असे भूषण यांच्या वतीने ज्येष्ठ वकील राजीव धवन म्हणाले. शिक्षा देऊन भूषण यांना ‘हुतात्मा’ बनवू नका. त्यांना दिलेल्या शिक्षेवरूनही चर्चा होत राहील. हा सगळा वादविवाद इथेच थांबवला पाहिजे, असेही धवन म्हणाले.

सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यावर, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर भूषण यांनी ट्वीटद्वारे टीका केली होती. न्या. अरुण मिश्रा, न्या. भूषण गवई व न्या. कृष्ण मुरारी यांच्या पीठाने त्यांना न्यायालयाच्या अवमान प्रकरणात दोषी ठरवले. माफी मागितल्यास शिक्षा सौम्य केली जाऊ शकते, असे न्यायालयाने सांगितले. पण, भूषण यांनी माफी मागण्यास दोनदा नकार दिला.

भूषण यांनी ट्वीटच्या समर्थनार्थ सादर केलेले निवेदन वाचून अत्यंत वेदना झाल्या. भूषण यांच्याकडे ३० वर्षांचा वकिलीचा अनुभव असून, त्यांनी (माफी न मागणारे) निवेदन न्यायालयापुढे मांडले. त्यांची ही कृती अयोग्य असून फक्त भूषणच नव्हे, तर (न्यायालयाची सूचना न मानणे) इतरांची वर्तणूकही तशीच होत असल्याचे दिसते, अशी टिप्पणी न्या. मिश्रा यांनी केली.

महान्यायवादी के. के. वेणुगोपाल म्हणाले की, भूषण यांनी खेद व्यक्त केला आहे. भूषण यांनी त्यांची सर्व विधाने मागे घ्यावीत. न्यायालयानेही त्यांना शिक्षा देऊ नये. त्यावर, भूषण यांना त्यांची चूक झाल्याचे वाटतच नाही. सर्वोच्च न्यायालयाची कार्ययंत्रणा ढासळली असल्याची त्यांची टीका आक्षेपार्ह नाही का, असा प्रतिप्रश्न न्या. मिश्रा यांनी विचारला.

न्यायप्रविष्ट प्रकरणाबद्दल प्रसारमाध्यमांतून चर्चा करणे कितपत उचित आहे? वकील आणि  राजकारणी यांच्यात फरक असतो की नाही, असाही प्रश्न न्यायालयाने विचारला. भूषण यांचे निवेदन न स्वीकारल्याबद्दल प्रत्येक जण न्यायालयावर टीका करत आहे. भूषण यांचे प्रत्युत्तर नोंदणीतून काढून टाकावे, असे महान्यायवादी सांगत आहेत. तसे न्यायालयाने स्वतहून केले तर त्याबद्दलही न्यायालयालाच जबाबदार धरले जाईल, असे न्या. मिश्रा म्हणाले.

शिक्षेचा निकाल राखीव

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी अध्र्या तासासाठी सुनावणी थांबवून भूषण यांना फेरविचाराचा सल्ला दिला. भूषण यांनी माफी मागण्याचा विचार करावा आणि १०० पानी निवेदन मागे घ्यावे, असे न्यायालयाने सुचवले. अवमान याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने शिक्षेचा निकाल राखून ठेवला.