22 September 2020

News Flash

नेपाळ भूकंपग्रस्तांसाठी जगभरातील स्वयंसेवकांची धडपड

नेपाळमधील गेल्या ८० वर्षांतील सगळ्यात मोठय़ा भूकंपातून वाचलेल्या लोकांना शोधण्याची आणि गरजूंना मदत पुरवण्याची धडपड भारतासह जगभरातून मदतीसाठी आलेले स्वयंसेवक करत आहेत.

| May 2, 2015 04:32 am

नेपाळमधील गेल्या ८० वर्षांतील सगळ्यात मोठय़ा भूकंपातून वाचलेल्या लोकांना शोधण्याची आणि गरजूंना मदत पुरवण्याची धडपड भारतासह जगभरातून मदतीसाठी आलेले स्वयंसेवक करत आहेत. या भूकंपातील बळींची संख्या ६२००वर, तर जखमींची संख्या १४ हजारांवर गेली आहे. नेपाळमधील अडीच लाखांहून अधिक इमारतींचे भूकंपामुळे नुकसान झाले आहे.
नेपाळमध्ये आता काळाबाजार आणि साठेबाजी
हिमालयाच्या कुशीतील नेपाळला भूकंपाचा धक्का बसला, तेव्हापासून जगभरातून मानवतावादी दृष्टिकोनातून मदत येणे सुरू झाले. एरवी विदेशी पर्यटकांनी गजबजलेले काठमांडू हे राजधानीचे शहर सध्या अनाहूत मदतकर्त्यांनी भरले आहे. या दुर्घटनेला सहा दिवस उलटून गेल्यानंतर, अद्याप ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती असलेल्या जिवंत व्यक्तींना शोधण्यासाठी मलब्याचे ढिगारे हुडकून काढत आहेत.
भूकंपामुळे उद्ध्वस्त झालेल्या नेपाळमधील परिस्थिती सामान्य व्हावी याकरता भारत, चीन आणि पाकिस्तान ही शेजारी राष्ट्रे मदत करत असून अमेरिका व पोलंड यांनीही पथके पाठवली आहेत. पाच महिन्यांचे एक मूल आणि १५ वर्षांचा एक किशोर आश्चर्यकारकरीत्या बचावल्यामुळे या अंधारलेल्या स्थितीतही आशेचे किरण दिसत आहेत. अनेक जण आपला जीव धोक्यात घालून दिवसरात्र परिश्रम करत आहेत.
जिनेव्हा येथील ‘इंटरनॅशनल कमिटी ऑफ दि रेड क्रॉस’ (आयसीआरसी) आणि ‘डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स’ यांसारख्या संस्थांचे कार्यकर्तेदेखील गोंधळ, दु:ख आणि भीतीच्या वातावरणात सहृदयतेची फुंकर घालत आहेत. डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्सच्या कार्यकर्त्यांनी अस्थायी रुग्णालये उभारली असून आवश्यक ती वैद्यकीय मदतही येऊन पोहोचली आहे. नेपाळमधील भूकंपग्रस्त कुटुंबे आणि समुदाय यांच्या वाढत्या गरजा पुऱ्या करण्यासाठी आयसीआरसी नेपाळ रेडक्रॉस सोसायटीला मदत करत आहे. बेपत्ता झालेल्या कुटुंबांचा शोध लावण्यासाठी त्यांनी संकेतस्थळही सुरू केले आहे.
या भूकंपात बळी पडलेल्यांची संख्या १५ हजार इतकी मोठी असू शकते, अशी भीती नेपाळच्या लष्करप्रमुखांनी काल व्यक्त केली होती. भारतात दिल्लीपासून बंगलोपर्यंत अनेक ठिकाणी स्वयंसेवकांनी भूकंपग्रस्तांसाठी मदत गोळा करणे सुरू केले आहे.
दरम्यान, ७.९ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे नेपाळमधील सुमारे १.४ लाख इमारती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या असून, विजेचे खांब व झाडे उन्मळून पडली आहेत. सुमारे १ लाख ३८ हजार घरांचे संपूर्ण, तर १ लाख २२ हजार घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. गृहमंत्रालयाच्या सूत्रांनुसार, १०,३९४ सरकारी इमारती भुईसपाट झाल्या असून १३ हजारांहून अधिक अंशत: ध्वस्त झाल्या आहेत. भूकंपात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ लाख रुपये, तर जखमींच्या उपचारासाठी २५ हजार रुपये मदत देण्याचा निर्णय नेपाळ सरकारने घेतला आहे.
विनाशकारी भूकंपाला आठवडाही व्हायचा असताना नेपाळला शुक्रवारी सकाळी ४ रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का बसला. काही तासांनी ४.२ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद काठमांडूपासून ३०० किलोमीटरवरील दोलाखा जिल्ह्य़ात करण्यात आली.

शतकांची पुराणवास्तू ८० सेकंदांत जमीनदोस्त..
काठमांडूत ऐतिहासिक महत्त्वाची गणली जाणारी, अनेक शतकांची ऐतिहासिक पुराणवास्तू गेल्या आठवडय़ात झालेल्या भीषण शक्तिशाली भूकंपात अवघ्या ८० सेकंदांत जमीनदोस्त झाली आहे. काठमांडू खोऱ्यातील एकूण ५७ स्मारके उद्ध्वस्त झाली असल्याची माहिती पुराणवास्तू विभागाचे संचालक भेश दहाल यांनी दिली.आमचे पथक सध्या या हानीचा विस्तृत तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘नेपाळ टाइम्स’ या वृत्तपत्राने दहाल यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. गेल्या १०० वर्षांत अनेक मंदिरे, वाडे नैसर्गिक आपत्तीत नष्ट झाले असले तरी त्यांची पुनर्बाधणीही सातत्याने करण्यात आली आहे. भक्तपूर, पाटण, काठमांडू, कीर्तीपूर, बंगमती, खोकाना, संखू आदी परिसरांतील ऐतिहासिक स्मारकांचा भूकंपाने घास घेतला असल्याचे स्पष्ट झाले आहे. काठमांडूमधीलच १९ व्या शतकातील नऊ मजल्यांचा ‘धरहरा टॉवर’  आणि दरबार चौक या भूकंपात पूर्णपणे नष्ट झाला असून या दोन्ही ठिकाणांना जागतिक वारसा असलेल्या वास्तूंचाही दर्जा देण्यात आला होता.‘स्वोता राधाकृष्ण मंदिर’ एखाद्या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणेच खाली आले.

मदत मिळवण्यासाठीही घ्यावे लागताहेत कष्ट..
भूकंपग्रस्त नेपाळमध्ये जगभरातून मदत येत असली, तरी ती मिळवण्यासाठीही लोकांना कष्ट घ्यावे लागत आहेत. पाच रात्री उघडय़ावर पावसात घालवल्यानंतर ६० वर्षे वयाच्या एका वृद्धेला अखेर डोक्यावर झाकण्यासाठी प्लास्टिकचा एक मोठा तुकडा मिळाला.सुखमाया तमांग या वृद्धेने उंचसखल अशा पहाडी मार्गावरून सुमारे २० किलोमीटर अंतर पायाखाली घातले, तेव्हा कुठे वातावरणापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी ‘इमर्जन्सी किट’ तिला मिळू शकली. पुन्हा हाच प्रवास तिला करावा लागला. ज्यांची दुर्गम पहाडी भागातील घरे धराशायी झाली, असे तिच्यासह शेकडो वृद्ध आणि गरीब लोक आणीबाणीच्या परिस्थितीत उभारण्याचे तंबू घेण्यासाठी या भागात येऊन गेले. तमांग हिच्या गोरखा जिल्ह्य़ात असलेल्या लहानशा खेडय़ापर्यंत दणकट ट्रक आणि एसयूव्हीसारखे वाहनही पोहचू शकत नाही. संकटाच्या या काळात हेलिकॉप्टर्स अपुरी आहेत आणि पावसामुळे त्यांचीही उड्डाणे कमी झाली आहेत. त्यामुळे घरापासून सर्वात जवळ असलेल्या बलुआ येथे पायी जाण्याशिवाय तिला पर्याय नव्हता. माझ्याजवळ घर नाही, अन्नही नाही, काहीच उरलेले नाही. मी खुल्या आकाशाखाली झोपते आहे. येथे येण्यासाठी मी चार तास पायी चालले आणि दोन दिवसांपासून मदत मिळण्याची वाट पाहते आहे, असे तिने सांगितले.भूकंपानंतर पाच दिवसांनी संयुक्त राष्ट्रसंघाचे मदतीचे ट्रक्स येथे येऊन पोहचले. पावसामुळे दलदल झालेल्या आणि रस्ते वाहून गेलेल्या भागातूनही निग्रही चालकांनी हे ट्रक्स इथपर्यंत आणले. मदतीचा हा ओघ पाहून बलुआ खेडय़ातील बुजुर्ग शेखर नाथ निओपानी आश्चर्याने थक्क झाले होते. एरवी विभाजित असलेले लोकही एकत्र येत असल्याबद्दल आणि परदेशी लोक आमच्यासाठी मदत घेऊन येत असल्याबद्दल आपल्याला आश्चर्य वाटत असल्याचे ते म्हणाले.

पाच दिवसांनी महिलेला ढिगाऱ्याबाहेर काढले
नेपाळला बसलेल्या भूकंपाच्या तडाख्यात कोसळलेल्या इमारतीच्या एका ढिगाऱ्याखालून १२८ तासांनी म्हणजेच तब्बल पाच दिवसांनी एका महिलेला जिवंत बाहेर काढण्यात यश आले आहे.नेपाळचे लष्कर आणि पोलीस आणि इस्राएलच्या मदत पथकाने संयुक्त कारवाई करून कृष्णा देवी खडका या महिलेस जिवंत बाहेर काढले. गोंग्गाबू अतिथिगृहाच्या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून कृष्णा देवी यांना बाहेर काढण्यात आले.भूकंपाच्या तडाख्यानंतर एका अल्पवयीन युवकाला पाच दिवसांनी जिवंत बाहेर काढण्यात आले. त्यानंतर आता कृष्णा देवी यांनाही जिवंत बाहेर काढण्यात आले आहे.पर्वतराजींमधील अत्यंत दुर्गम भागांत पोहोचण्याचा प्रयत्न मदतकार्य पथकातील कर्मचारी करीत आहेत, मात्र मुसळधार पाऊस आणि दरडी कोसळण्याच्या प्रकारांमुळे मदतकार्यात अडथळे निर्माण होत आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2015 4:32 am

Web Title: global activists joins hand in rescue program
टॅग Nepal Earthquake
Next Stories
1 नेपाळमध्ये आता काळाबाजार आणि साठेबाजी
2 दहशतवादाच्या भीतीमुळे मेट्रो स्थानकांवर कचरापेटय़ा नाहीत
3 खुनाचा कट रचल्याबद्दल सनदी अधिकाऱ्याला अटक
Just Now!
X