उत्तर प्रदेशातील गोरखपूर मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजन अभावी झालेल्या अर्भक मृत्यूप्रकरणी आरोपी असलेले निलंबित बालरोगतज्ज्ञ डॉ. काफील खान हे निर्दोष ठरले असून विभागीय चौकशीत त्यांना क्लीनचीट देण्यात आली आहे.

याप्रकरणी विभागीय चौकशीसाठी हिमांशू कुमार यांना तपास अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. अनेक महिने चाललेल्या या चौकशीनंतर सुमारे चार महिन्यांपूर्वीच चौकशीचा संपूर्ण अहवाल शासनाकडे सोपवण्यात आला होता. या अहवालात म्हटले आहे की, डॉ. काफील खान यांच्याकडून या प्रकरणी कोणताही निष्काळजीपणा झालेला नाही. त्यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप असंबंध आणि निराधार आहेत.

दोन वर्षांपूर्वी गोरखपूर मेडिकल कॉलेजमध्ये १० ते १२ ऑगस्ट २०१७ दरम्यान १०० खाटांच्या वॉर्डमध्ये सुमारे ७० नुकत्याच जन्मलेल्या मुलांचा मृत्यू झाला होता. ऑक्सिजन अभावी हे मृत्यू झाल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते.

प्राथमिक चौकशीत मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. काफील खान, डॉ. सतीश यांच्यासह रुग्णालयाचे ५ कर्मचारी आणि १ ऑक्सिजन सिलेंडरचा वितरक मनिष भंडारी यांनी आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली नसल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यानंतर २२ ऑगस्ट रोजी डॉ. काफील खान यांना निलंबित करण्यात आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर त्यांना सुमारे ९ महिन्यांसाठी तुरुंगवासही भोगावा लागला होता. चौकशीदरम्यान, डॉ. काफील खान यांनी कोणताही निष्काळजीपणा केला नसल्याचे निष्पण्ण झाले. यासंदर्भात त्यांनी १८ एप्रिल २०१९ रोजी उत्तर प्रदेश सरकारला अहवाल पाठवला होता. यामध्ये डॉ. खान यांना निर्दोष असल्याचे म्हटले होते. मात्र, या अहवालाला चार महिन्यांपेक्षा अधिक काळ दाबून ठेवण्यात आला होता, असे विविध माध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.