“आकडे फसवत नाहीत, भारत सरकार फसवतं”, असं म्हणत काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी न्यूयॉर्क टाईम्सच्या बातमीचा एख स्क्रीनशॉट शेअर केला होता. भारत सरकार देशातील करोना मृत्यूंची चुकीची माहिती देत असल्याचा दावा या बातमीमध्ये करण्यात आला होता. यावरून आता केंद्र सरकारने आपली बाजू स्पष्ट केली असून न्यूयॉर्क टाईम्समध्ये छापून आलेल्या वृत्ताचं खंडन केलं आहे. हे वृत्त पूर्णपणे निराधार आणि चुकीचं असल्याचं केंद्र सरकारकडून आरोग्य खात्याचे सहसचिव लव अगरवाल यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच, न्यूयॉर्क टाईम्समध्ये देण्यात आलेले आकड्यांचे अंदाज दिशाभूल करणारे असल्याचं देखील त्यांनी नमूद केलं आहे.

 

काय आहे न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तात?

न्यूयॉर्क टाईम्सने आपल्या वृत्तामध्ये भारत सरकार देत असलेले मृत्यूंचे आकडे अवास्तव असल्याचं म्हटलं होतं. यासाठी वृत्तामध्ये वास्तवात मृत्यूंचे आकडे किती असू शकतात, याचे अंदाज दिले होते. त्यावर “भारतातील खऱ्या करोना मृतांचा आकडा नेमका किती मोठा असू शकतो?” असा मथळा देण्यात आला होता. यातल्या वृत्तानुसार भारतात दिला जाणारा मृतांचा अधिकृत आकडा ३,०७,२३१ इतका असून तो किमान ६ लाख असू शकतो. अधिक अचूकपणे तो अंदाजे १६ लाख असू शकतो. पण परिस्थिती खरंच गंभीर असल्यास तो कदाचित ४२ लाख इतका असू शकतो, अशी आकडेवारी देण्यात आली आहे. यासाठी मृतांची आकडेवारीचं आणि करोनाबाधितांच्या आकडेवारीशी असलेलं प्रमाण आधार मानण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. यावरून केंद्र सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले. राहुल गांधी यांनी देखील या आकडेवारीवरून केंद्र सरकारवर टीका केल्यानंतर या मुद्द्यावर लव अगरवाल यांनी आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टीकरण दिलं आहे.

 

निराधार वृत्त…

“हे वृत्त पूर्णपणे निराधार आणि चुकीचं आहे. त्याला कोणत्याही पुराव्याचा आधार नाही. आम्ही सुरुवातीपासूनच नवे करोनाबाधित आणि मृत्यूंची संख्या पारदर्शीपणे नोंदवण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे नेमकी करोनाची परिस्थिती समजण्यासाठी फायदा होऊन योग्य ते उपाय योजनं शक्य होतं”, अशी माहिती लव अगरवाल यांनी दिली आहे.

दिलासा! महाराष्ट्रात मृतांच्या आकड्यात घट, नव्या करोनाबाधितांची संख्याही घटली!

“या गणिताने न्यूयॉर्कमध्ये १.७५ लाख मृत्यूची नोंद हवी!”

दरम्यान, निती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी देखील या मुद्द्यावर सविस्तर भूमिका मांडली आहे. “न्यूयॉर्क टाईम्सने ही आकडेवारी नेमकी कशाच्या आधारावर घेतली? त्याला कोणताही आधार नाही. जर हेच गणित न्यूयॉर्कमधल्या मृतांच्या आकडेवारीसाठी लावायचं झाल्यास, मे महिन्यात न्यूयॉर्कमध्ये १.७५ लाख मृत्यू झालेले असू शकतात. पण ते हे मान्य करणार नाहीत. ते सांगतात फक्त १६ हजार मृत्यू. त्यांनी दिलेली आकडेवारी ही वास्तवापासून दिशाभूल करणारी आहे. हे फक्त काही लोकांना वाटलं म्हणून त्यांनी गृहीत धरलं. एका नावाजलेल्या वृत्तपत्राने अशा प्रकारे माहिती छापायला नको होती. भारताकडे मृत्यूदर मोजण्याची सक्षम पद्धती अस्तित्वात आहे”, असं व्ही. के. पॉल म्हणाले.

न्यूयॉर्क टाईम्सने या वृत्तामध्ये भारतातील करोना मृतांची संख्या मोजण्याच्या पद्धतीवर देखील आक्षेप घेण्यात आले होते. “भारतात लोकांच्या चाचण्याही व्यवस्थित केल्या जात नाहीत आणि रुग्णांच्या मृतांची नोंद देखील व्यवस्थित ठेवली जात नाही. करोनामुळे अनेक रुग्णांचा घरीच मृत्यू होत असून ग्रामीण भागांमध्ये होणाऱ्या मृत्यूंचा समावेश देखील सरकारी आकडेवारीमध्ये होत नाही”, असा दावा या वृत्तात करण्यात आला होता.