देशभरात चलन तुटवडा निर्माण झाला असतानाच केंद्र सरकारने यावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. देशात पाचशेच्या नोटांची छपाई पाच पटींनी वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

अर्थखात्याचे सचिव एस सी गर्ग यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन चलन तुटवड्याबाबत माहिती दिली. सध्या दररोज ५०० कोटी पाचशेच्या नोटा छापल्या जातात. आगामी काळात यात पाच पटींनी वाढ केली जाणार असून आगामी काळात दररोज पाचशेच्या अडीच हजार कोटी नोटा छापल्या जातील, अशी माहिती त्यांनी दिली. यानुसार महिनाभरात जवळपास ७० ते ७५ हजार कोटी नोटा छापल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, सोमवारी महाराष्ट्र, बिहार, गुजरात या राज्यांमध्ये चलनतुटवडा निर्माण झाल्याने एटीएममध्ये रोकड उपलब्ध नव्हती. आंध्र प्रदेश आणि तेलंगण येथे देखील महिनाभरापूर्वी चलनतुटवडा निर्माण झाला होता.  केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी देखील यावर स्पष्टीकरण दिले. देशात चलन तुटवडा नाही. फक्त काही ठिकाणी अचानक मागणी वाढल्यामुळे अडचणी आल्या आहेत. बँकांमध्ये पुरेशा प्रमाणात पैसे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनीही माध्यमांशी बोलताना ही समस्या दोन-तीन दिवसांत संपुष्टात येईल आणि देशात चलन तुटवडा भासणार नसल्याचे सांगितले. सध्या रिझर्व्ह बँकेकडे पुरेशा प्रमाणात चलन आहे. असमानतेमुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून काही राज्यांत कमी चलन आहे, तर काही ठिकाणी जास्त चलन असल्याचे त्यांनी सांगितले.