पुढील काही दिवसांमध्ये देशात खासगी रेल्वे सुरू होणार आहेत. परंतु त्या ट्रेननं प्रवास करणं थोडं महाग पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, विमान कंपन्यांच्या धर्तीवर खासगी ट्रेननादेखील आपल्या तिकिटांचे दर निश्चित करता येणार आहेत. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार देशात खासगी रेल्वेसेवा सुरू झाल्यानंतर सरकार त्या ट्रेन चालवणाऱ्या कंपन्यांना या प्रकारची सूट देण्याची तयारी करत आहे.

खासगी कंपन्यांच्या रेल्वे गाड्यांना त्यांच्या तिकिटाचे दर निश्चित करण्याची परवानगी देण्यात आली असल्याची माहिती भारत रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही.के.यादव यांनी सांगितलं. परंतु त्या मार्गावर एसी बसेस किंवा विमानांची सुविधा असेल तर तिकिटाचे दर निश्चित करण्यापूर्वी ही बाब ध्यानात ठेवावी लागणार आहे.

या कंपन्यांना रस

एल्सटॉम, बॉम्बार्डियर इंक, जीएमआर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि अदानी एन्टरप्राइजेज लिमिटेड या कंपन्यांनी या योजनेमध्ये रस दाखवला आहे. या योजना पुढील पाच वर्षांमध्ये ७.५ अब्ज डॉलर्सपर्यंतचीही गुंतवणूक आणू शकतात, असं रेल्वे मंत्रालयाचं मत आहे. तर दुसरीकडे रेल्वेनं नवी दिल्ली आणि मुंबईसहित रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठीही गुंतवणुकदारांना निमंत्रित केलं आहे.

का आवश्यक?

२०२३ पर्यंत देशातील पहिली बुलेट ट्रेन चालवण्यासाठी जपानकडून कमी दरात केंद्र सरकारनं कर्ज घेतलं आहे. तर दुसरीकडे विद्यमान रेल्वे सेवांचं आधुनिकीकरण होणं आवश्यक आहे. सरकारनं प्रवासी रेल्वे ट्रेनची गती वाढवण्यासाठीही आवश्यक ती पावलं उचलण्यात येत आहेत.