आगामी सणासुदीच्या काळात कांद्याचे भाव वाढू देणार नाही असे कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी सांगितले. सरकार वेगवेगळय़ा उपाययोजना करून कांद्याचे भाव किलोला ८०-१०० रुपये या पातळीला जाऊ देणार नाही असे ते म्हणाले.
विलंबित मान्सूनमुळे खरिपाचा कांदा येण्यास विलंब होणार आहे. महाराष्ट्र, राजस्थान व मध्य प्रदेश या राज्यांमधून हा कांदा येणे अपेक्षित असले तरी तो उशिरा येईल, त्यामुळे सप्टेंबरअखेर व ऑक्टोबरमध्ये कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे, पण ते वाढू देणार नाही. सध्या दिल्लीत २५-३० किलो दराने कांदा विकला जात आहे तरीही यापूर्वी तेथे कांद्याचे भाव ८०-१०० रुपये किलो होत. कांद्याचे भाव पुन्हा ८० ते १०० रुपये किलोपर्यंत जाणार नाहीत यासाठी उपाययोजना केल्या जातील. कांद्याचे भाव वाढू नयेत यासाठी सरकारने आयात कांद्यावर फवारणीचा निकष दूर केला आहे त्यामुळे कांद्याच्या आयातीसाठी लागणारा वेळ कमी होईल.  भारतात देशांतर्गत कांद्याची जून ते नोव्हेंबपर्यंतची गरज रब्बीचा जुना कांदा व खरिपाचा नवा कांदा यातून पूर्ण केली जाते. कांद्याचे भाव किलोला २० ते ३० रुपये आहे. मुंबईत ३२ रुपये, चेन्नई व कोलकाता येथे २५ रुपये किलो याप्रमाणे आहेत.