देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली गुजरातमधील काँग्रेस नेता हार्दिक पटेल यांना अटक करण्यात आली आहे. अहमदाबादमधील विरमगांवमध्ये हार्दिक पटेलला पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी न्यायालयानं हार्दिक पटेलविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होते. २४ जानेवारी रोजी  हार्दिक पटेल यांना कोर्टात हजर राहण्यास सांगितलं होतं. त्यापूर्वीच पोलिसांनी पटेल यांना ताब्यात घेतलं आहे. हार्दिक यांना उद्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

ऑगस्ट २०१५ मध्ये पाटीदार आंदोलकांच्या आंदोलनादरम्यान हार्दिक पटेल यांच्या सभेनंतर गुजरातच्या विविध भागांत हिंसाचार पेटला होता. त्यावेळी मोठ्या प्रमाणात तोडफोडही करण्यात आली होती. याप्रकरणी हार्दिक पटेल यांच्यावर ऑक्टोबर २०१५ मध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणीच्या सुनावणीला हार्दिक पटेल वारंवार अनुपस्थित राहत असल्यामुळे अहमदाबादमधील एका कोर्टानं त्यांच्याविरोधात आज अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं होतं. वॉरंट जारी झाल्यानंतर पोलिसांनी लगेच हार्दिक पटेल यांना ताब्यात घेतलं आहे.